पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 जण ‘कोरोनामुक्त’; 2 दिवसात 8 रुग्ण ‘कोरोनामुक्त’

1070

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. आज पाच रुग्णांच्या दुस-या चाचणीचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले असल्याने त्यांना उद्या ‘डिस्चार्ज’ देण्यात येणार आहे. तर, शुक्रवारी पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले होते. तीन दिवसात आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. तर, आणखी एका रुग्णाचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता केवळ चार कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर, मागील आठ दिवसात शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. ही आनंदाची बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. लागोपाठ असे 12 रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 14 दिवस उपचार घेतलेले रुग्ण ‘कोरोनामुक्त’ व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिले तीन रुग्ण शुक्रवारी ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. शनिवारी (दि.28) आणखी पाच रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले होते. या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने पुन्हा एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात आले होते.  या दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. हे पाच रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यामुळे या रुग्णांना उद्या सकाळी घरी सोडण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून आता केवळ चार रुग्ण कोरोनाबाधित आहेत.  तर, आणखी एका रुग्णांचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असल्याने ही सर्वांत मोठी शहरवासीयांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.  शहरात कोरोनाचे नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत नसले. तरी, नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. वारंवार हात धुवावेत. सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या