पिंपरी- आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 17 संशयितही निगेटिव्ह

769

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात 14 दिवस उपचार घेतलेल्या आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांचे आज आणखीन एकदा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर, 17 संशयितही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. शहरात आता आठ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर लागोपाठ असे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. आता आणखीन पाच रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने शनिवारी आणखीन एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात येणार आहे. या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 17 संशयितांचे रिपोर्ट देखील ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोना बाधित असलेल्या 9 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

आपली प्रतिक्रिया द्या