रेल्वेचे खासगीकरण नाही; पण गुंतवणूक गरजेची; रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे ही देशाची संपत्ती असून तीचे कधीही खासगीकरण होणार नाही. पण रेल्वेमध्ये पुरविण्यात येणाऱया अनेक सुविधा व सुधारणांसाठी गुंतवणूक गरजेची असल्याचे स्पष्ट करत रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेमधील खासगी गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.

केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. यासंदर्भात लोकसभेत बोलताना पीयुष गोयल म्हणाले, रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील, परंतु यात जर खासगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कोणालाही अडचण होऊ नये. खासगी आणि सरकारी दोन्हीही क्षेत्रे अर्थचक्र पुढे नेण्यासाठी मदतच करतात, असा दावा करत विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. रेल्वे स्थानकात वेटिंग रूम, एस्केलेटर आणि अशा अनेक सुविधांची गरज आहे. जवळपास 50 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. नवीन 44 ‘वंदे भारत’ ट्रेन चालविण्यात येणार असून याची ऑर्डरही देण्यात आली आहे. लवकरच मार्ग निश्चित करून ट्रेन सुरू केल्या जातील, असे गोयल म्हणाले.

रस्त्यावर खासगी गाडय़ा धावत नाहीत का?

कोणीही कधी असे म्हटले नाही की, रस्त्यावर फक्त सरकारी वाहने धावली पाहिजेत. रस्तेसुद्धा राष्ट्रीय संपत्ती, त्यावर खासगी गाडय़ा धावत नाहीत का? असा प्रश्न पीयुष गोयल यांनी केला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी रेल्वेमध्ये सुधारणा आवश्यक असून त्यासाठी खासगी गुंतवणुकीला रेल्वेत प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.