सुरेल वाणी हरपली! विख्यात गायिका वाणी जयराम यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीतविश्वातून धक्कादायक बातमी आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अलीकडेच त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

तामीळनाडूतील वैल्लोर येथे जन्मलेल्या वाणी जयराम यांचे खरे नाव कलैवानी होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’वर पहिल्यांदा परफॉर्म केले. ‘गुड्डी’ चित्रपटातील ‘बोले रे पापीहारा’ हे गाणे तसेच ‘पाकीझा’ या चित्रपटातील ‘मोरे साजन सौतन घर’ ही गझल त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहे. ‘एक मुठ्ठी आसमां’, ‘खून का बदला खून’ आणि ‘सोलवा सावन’सह अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकातील ‘ऋणानुबंधाच्या’ हे प्रसिद्ध मराठी गाणेदेखील त्यांनी गायले. गायिका वाणी जयराम यांच्या आयुष्यात त्यांचे पती टी. एस. जयरमन यांचे मोठे योगदान होते. 2018 साली त्यांच्या पतीचे निधन झाले होते.

19 भाषांमध्ये गायली 10 हजार गाणी  

वाणी जयराम यांनी आपल्या पाच दशकांच्या सांगीतिक कारकीर्दीत हिंदी, तमीळ, तेलुगू, मराठी, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आदी 19 भाषांमधील दहा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. इलैयाराजा, आर. डी. बर्मन, केवी महादेवन, ओ. पी. नय्यर आणि मदन मोहन यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना 1975, 1980 आणि 1991 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अलीकडेच त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.