मेस्सी निवृत्त होतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लुसाईल स्टेडियमवर फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळून मी माझा आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा प्रवास थांबवतोय.’  खुद्द फुटबॉलचा मसीहा लिओनल मेस्सीने खुलासा करीत आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे रविवारी होणारा अंतिम सामना सर्वार्थाने संस्मरणीय करण्यासाठी आणि अर्जेंटिनाला जगज्जेतेपद जिंकून देण्यासाठी मेस्सी पूर्ण ताकदीनिशी उतरेल. तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 176 सामने खेळला असून त्याने 96 गोल ठोकले आहेत.

मेस्सीच्या खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने 2014 साली फिफा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती, पण त्यांना जगज्जेतेपदाचा कारनामा करता आला नव्हता. मात्र आता अर्जेंटिनाला जगज्जेतेपदाचा करंडक जिंकून मेस्सीला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा सोनेरी शेवट करण्याची ऐतिहासिक संधी लाभली आहे. क्रोएशियाचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रसन्न लिओनल मेस्सी म्हणाला, ‘संघाला अंतिम फेरीत पोहचविल्यानंतर मी स्वतःला खूप आनंदी समजतोय. चार वर्षांनंतर मी पुन्हा अशी कामगिरी करीन असे मला वाटत नाही. त्यामुळे या टप्प्यावर निवृत्त होणे माझ्यासाठी सन्मानाचे असेल.’ ही प्रतिक्रिया व्यक्त करीत मेस्सीने आपला अर्जेंटिनासाठी रविवारी अखेरचा सामना खेळणार असल्याचेही स्पष्ट केले.

2014 साली मेस्सी संघाला जगज्जेता करण्यात यशस्वी ठरला नव्हता. मात्र त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवित ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार जिंकला होता. आता त्याला ‘गोल्डन बॉल’सह ‘गोल्डन बूट’ आणि अर्जेंटिनासाठी जगज्जेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. 35 वर्षीय मेस्सीने क्रोएशियाविरुद्ध पेनल्टीवर गोल ठोकून अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणाऱया गॅब्रियल बॅटिस्टुटाच्या दहा गोलांच्या विक्रमाला मागे टाकले. आता तो 11 गोलांसह सॅण्डर कोचसिस आणि यर्गन क्लिंसमनच्या पंक्तीत आहे. मेस्सीने पाच वर्ल्ड कप स्पर्धा खेळताना 25 सामन्यांत 11 गोल केले आहेत. एवढेच नव्हे तर वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 25 सामने खेळणाऱया लूथर मथायसच्या विक्रमाची बरोबरी साधली असून रविवारी त्यांना मागे टाकेल.