
मंगेश सौंदाळकर
पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँक खात्यात 15 हजार रुपये जमा होणार असे सांगून भोळय़ा भाबडय़ा नागरिकांची बँक खाती उघडून त्या खात्याचा वापर फसवणुकीचे पैसे वळण्यासाठी करणाऱ्याला अखेर दहा महिन्यांनी बोरिवली रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. आरोपीने ओडिशा येथे एका सरकारी बँकेचे युनिट सुरू केले होते. त्या युनिटच्या माध्यमातून त्याने अनेक नागरिकांची खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे.
मालाड येथे महिला राहतात. त्यांना नोकरीची गरज होती. जानेवारी महिन्यात त्या मालाड येथून चर्चगेटला जात होत्या. तेव्हा त्यांना मोबाईलवर लिंक आली. नोकरीच्या नावाखाली आरोपीने महिलेला देणगी म्हणून 10 रुपये भरण्यास सांगितले. तसेच त्या लिंकमध्ये वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. ती माहिती भरल्यानंतर महिलेच्या खात्यातून 70 हजार रुपये काढले गेले. पैसे गेल्यावर महिलेने ठगाला फोन केला. ते पैसे खात्यात जमा होतील असे सांगितले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.
वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दर्शन पाटील, सकपाळ, पाटील, पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना बँक खात्याची माहिती मिळाली. त्या खात्यात रोज लाखो रुपये जमा होऊन ते रात्री काढले जात होते. ते खाते ओडिशा येथील ग्रामीण भागातील असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक ओडिशाच्या बालासो गावात गेले. तेथे एका व्यक्तीची चौकशी केली. ती व्यक्ती झोपडीत राहत असून विडी वळण्याचे काम करत होती. तिला खात्यात पैशाबाबत विचारले असता तिला ते खाते अटक आरोपीने उघडून दिल्याचे सांगितले गेले. बँक खाते उघडल्यावर फक्त पासबुकच त्यांना दिले होते. पोलिसांचे पथक बालासो गावात गेले. त्या बँक युनिटमधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, तर त्याचा साथीदार हा पळून गेला. आरोपीला अटक करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले गेले.
एटीएम स्वतःकडे ठेवायचा
आरोपीने गेल्या दोन वर्षांत अनेक गावकऱ्यांचे खाते उघडले. पंतप्रधान योजनेअंतर्गत 15 हजार रुपये जमा होणार आहे अशा तो भूलथापा मारायचा. तो गावकऱ्यांना एटीएम आणि डेबिट कार्ड न देता स्वतःकडे ठेवत असायचा. त्या खात्यात दररोज लाखो रुपये जमा होत असायचे.
तीन दिवस थांबावे लागले
पोलिसांना आरोपीची माहिती समजताच पोलीस ओडिशाच्या बालियापाल पोलीस ठाण्यात गेले. तेथील स्थानिक पोलिसांनी मदत करण्यास विलंब केला. त्यामुळे बोरिवली रेल्वे पोलिसांना तीन दिवस ताटकळत थांबावे लागले.




























































