बाळाला ‘जिवंत’ करण्याची घटना ऐकून पंतप्रधानही झाले थक्क

72

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील आशा व आंगणवाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यादरम्यान एका आंगणवाडी कार्यकर्त्यांनी सांगितलेली बाळाला जिवंत करण्याची घटना ऐकून पंतप्रधान देखील थक्क झाले. या दरम्यान मोदी यांनी या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आणि ‘हिंदुस्थानची खरी पुत्री’ असा उल्लेख करत सन्मान केला.

पंतप्रधानांसोबत लाईव्ह संवाद साधताना झारखंडच्या सरायकेला येथील उर्मालची रहिवासी आंगणवाडी कार्यकर्ता मनीता देवी यांनी एक घटना सांगितली. उर्माल भागात राहणाऱ्या मनीषा देवी यांची प्रसुतीपूर्वी सर्व तपासणी करण्यात आली होती. 27 जुलै, 2018 रोजी रात्री दोन वाजता मनीषाला प्रसव वेदना सुरू झाल्याची माहिती मनीता यांना मिळाली. मनीता घरी पोहोचेपर्यंत मनीषा यांची प्रसुती झाली होती. प्रसुतीनंतर बाळ रडत नसल्याचे दिसून आले.

बाळ मृत जन्माला आल्याची चर्चा घरात सुरू झाली होती. मनीता यांनी घरच्यांना बाळ दाखवण्याची विनंती केली. परंतु तू बाळ पाहून काय करणार? असे घरच्यांनी विचारले. परंतु मनीता आपल्या मागणीवर ठाम राहिली. तिच्या जिद्दीपुढे हार मानत मनीषा हिच्या घरच्यांनी तिच्याजवळ बाळ सुपूर्द केले. बाळ कडेवर घेताच त्याच्या ह्रदयाची धकधक सुरू असल्याचे मनीता यांच्या लक्षात आले. मनीताने तत्काळ एका पाईपच्या मदतीने बाळाच्या नाकातून आणि तोंडातून पाणी काढले, त्यानंतर बाळ रडू लागले. त्यानंतर तिने बाळाला आईकडे दूध पाजण्यासाठी सुपूर्द केले. ही घटना ऐकताच मोदींनी टाळ्या वाजवून मनीताच्या प्रसंगावधानाची प्रशांसा केली.

‘एका आदिवासी भागात जन्माला आलेली मनीता हिने आपल्या बुद्धीने एका मुलाचा प्राण वाचवला, याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. जीवन देणारा आणि जीवन देणारा देवापेक्षा कमी नसतो, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या