जम्मू-कश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याच्या जोरदार हालचाली; पंतप्रधान मोदींची गुरुवारी प्रादेशिक पक्षांशी बैठक

modi-shah

जम्मूकश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी तिथल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता जम्मूकश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालींना गती दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अनेक महिन्यांपासून या रणनीतीवर काम करीत आहेत.

पंतप्रधानांसोबतची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या ब्लू प्रिंटवर पंतप्रधान चर्चा करणार आहेत तसेच या बैठकीनंतर केंद्र सरकार आणि जम्मू- कश्मीरातील पक्षांबरोबर चर्चेची सुरुवात होणार आहे. बैठकीला नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीसह काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे. यावेळी कश्मीर खोऱयाशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधी शुक्रवारीही दिल्लीत दोन महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. जम्मू-कश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळू शकतो. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले होते. सध्या लडाखच्या बाबतीत कोणताही बदल केला जाणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी सरकार जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या विषयाकडे मोठे यश म्हणून पाहत आहे.

  • केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा हटवून जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर कश्मीर खोऱयातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. प्रशासनाने हळूहळू सर्व निर्बंध हटवले तसेच नेत्यांची नजरकैदेतून सुटका केली.
  • जम्मू-कश्मीर आणि लडाख वेगळे केल्यानंतर सरकारने आपले सर्व रणनीतिक उद्देश साध्य केले आहेत. कश्मीरातील सुरक्षेची परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. नजरकैदेतून बाहेर पडलेले नेतेही आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या