
तृणमूल काँग्रेस अर्थात ‘टीएमसी’ने पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांची नवी जात निर्माण केली आहे. ‘टीएमसी’ म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन आहे, अशी टिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, गुरुवारी पुरूलिया येथे पंतप्रधान मोदींची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला पंतप्रधानांनी लक्ष्य केले. ममता बॅनर्जी माझ्यावर सगळा राग काढत आहेत. पण देशातील कोटय़वधी मुलींप्रमाणे त्या आहेत. आदर करणे ही आपली संस्कृती आहे. त्यांच्या पायाला जखम झाली असून, त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करतो असेही मोदी म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अनेक वर्षे चुकीच्या पद्धतीने सरकार चालविले. त्याची शिक्षा जनता यावेळी देईल. ममता बॅनर्जी म्हणतात, ‘खेला होबे’ पण भाजप म्हणते ‘विकास होबे’ ‘शिक्षा होबे’ टीएमसीने माओवाद्यांची नवीन जात निर्माण केली. जनतेचे पैसे लुटणे एवढेच या नवीन माओवाद्यांचे काम आहे. ‘टीएमसी’ म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. लोकसभेत ‘टीएमसी’ हाफ साफ झाली. आता विधानसभा निवडणुकीत पूर्ण साफ होईल असे सांगतानाच पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी सरकारने सिंचनाच्या प्रश्नासही पाण्याच्या समस्येकडे, शेतीकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांनी केला.






















































