
सामना ऑनलाईन । सिल्वासा
ज्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्षांना कार्यक्रम करण्यावर बंदी घातली जाते, लोकशाहीचा गळा घोटला जातो तिथेच आज लोकशाही वाचवण्याच्या बाता मारल्या जात आहेत ते पाहून ‘वाह, क्या सीन है’ असेच शब्द मुखातून बाहेर पडतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात आयोजित केलेल्या आजच्या विरोधी पक्षांच्या ‘महारॅली’वर तोफ डागली. ते दमण आणि दीवमधील सिल्वासा येथील जाहीर सभेत बोलत होते.
एका मेडिकल कॉलेजची कोनशिला बसवल्यानंतर मोदी म्हणाले की, आमची नीती देशाच्या विकासाची आहे. विकासासाठीच आम्ही झटत आहोत. आमची नीती आणि इरादा परिवाराच्या विकासाचा नाही, मात्र आमची साफ नियत आणि स्पष्ट नीतीच विरोधकांना खुपते आहे. मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात इतकी कठोर कारवाई का करताहेत असा प्रश्न त्यांना पडला असून त्याचाच त्रास त्यांना होत आहे.
कोलकात्यात गोळा झालेल्या नेत्यांचा राग माझ्यावर आहे. त्याचे कारण एकच आहे की, मी त्यांना पैसा लुटण्यापासून रोखले आहे. त्यामुळेच त्या सगळय़ांनी ‘महाआघाडी’ बनवली आहे; पण कोणतीही ‘महाआघाडी’ त्यांच्या सुलतानशाहीला वाचवू शकत नाही असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
कोलकात्यातील लोक स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काम करीत आहेत. मी मात्र देशाला वाचविण्यासाठी झटत असून ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करीत आहे असे ते म्हणाले.



























































