पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर, काय कारण? चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बीकेसी येथे भव्य सभाही घेतली होती. या दौऱ्याला एक महिना होत नाही तोच पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला मोदी दाऊदी बोहरा समाजाच्या अंधेरी येथे बांधण्यात आलेल्या विद्यापीठाचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून सध्या राजकीय चर्चांना देखील उधाण आलं आहे.

शिवसेनेतून गद्दार गट बाहेर पडूनही शिवसेनेच्या लोकप्रियतेत बिलकूल घट झालेली नाही. आता निवडणूका झाल्या तर महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकणार असे सर्वेक्षण नुकतेच इंडिया टुडे सी व्होटरच्या ताज्या सर्व्हेत समोर आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीला 48 पैकी दणदणीत 34 जागा मिळतील. तर, भाजपा-शिंदे गटाचा धुव्वा उडेल असे या सर्व्हेत स्पष्टपणे म्हटले आहे. त्यातच आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. शिवसेनेची लोकप्रियता व सी व्होटरचा सर्व्हे याची धास्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत अन्य कोणतेही चेहरे वापरण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा वापरण्य़ाचे भाजपने ठरवलेले समजते. त्यामुळेच मुंबई महानगर पालिके निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबई दौरे आखले जात असल्याचे समजत आहे. . या दौऱ्यात सीएसएमटी स्थानकावरून दोन वंदे भारत एक्सप्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याचेही समजते.

दाऊदी बोहरी समाजाची मतं

निवडणूकीत दाऊदी बोहरी समाजाची मतं मिळविण्यासाठी देखील पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे असा अंदाज भाजपच्या नेत्यांना वाटतो आहे. दाऊदी बोहरा समाजाने अंधेरी येथे बांधलेल्या अरेबिक विद्यापीठाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.