शब्दांचा मनभर सुगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक समेळ

ज्येष्ठ कवी सुरेश भट. त्यांचा प्रत्येक शब्द काव्याच्या सुगंधाने भारलेला… मंतरलेला… त्यांचे शब्द कधी श्रृंगारलेले असतात… तर कधी आसुड होऊन बरसतात. तर कधी व्याकुळ होऊन पाणावतात…

फुलांच्या सुगंधाची कुणी चर्चा करत बसत नाही. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर तो सुगंध आला की मन आल्हाददायक बनून जातं. परमेश्वराचा सुगंध आणि छोटय़ा तान्हुल्याची पापी कळायला पुस्तकी पांडित्याची गरज नाही. सुंदर आणि सजीव कवितेचंही तसंच असतं…!

कविता म्हणजे आकाशाची वीज. वीज धरण्याच्या प्रयत्नात माणसं होरपळतात, जळतातही. हे होरपळणे, जळणे दृष्टीआड राहते आणि आपल्याला फक्त काव्याचे दर्शन घडते. जळणाऱया माणसाने आपण कशासाठी जळतो आहोत? हा प्रश्न स्वतःला केव्हातरी विचारावा म्हणजे जळणे सुसह्य होईल. भावबंधनाचे संदेश शोधणं हे काव्याचं काम आहे. असे मला गवसलेले अवाढव्य कवी, गझल आणि गीतकार स्वर्गीय सुरेश भट…

सुरेश भटांची कविता नवकवितेच्या एका निराळय़ा वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रकटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तीचा इथे फुलोरा आहे…! आपल्या जवळचा कुणी निधन पावला की, त्याच्या नातेवाईकांना आपण भेटायला जातो तेव्हा त्याच्या मनोवृत्तीचं आणि ज्याचा माणूस गेला त्याच्या मनोवृत्तीचं भटसाहेब किती मनोज्ञ तेवढंच जिव्हारी टोचणारं वास्तव टिपतात.

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले!
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले!
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
तो कसा होता मलाही आठवावे लागले
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले!

सर्व प्रथितयश कवींना भेटणारे शब्द सतत फुलपाखरासारखे त्यांच्या भोवती हिंडत असल्यासारखे वाटतात. तसंच सुरेश भटांच्या भोवती हे सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाणाऱया कवितेने या सुरांच्या गळा घालून सुरेश भटांनी गायला सुरुवात केली. सुरेश भट गीताबरोबर चाल घेऊन जन्माला येऊन गीत त्यांचे गाणे कधी व्हायचे आणि ते गाणे त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती होती, जी माझ्या वाटय़ाला आली. 1986 ला आमच्या नाटकाचा दौरा विदर्भात होणार होता. प्रभाकर पणशीकर मी सुरेश भटांचा चाहता असल्यामुळे मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मी अत्यंत आदरानं त्यांना म्हणालो, ‘‘सर, ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ हे आपलं काव्य आणि गाणंही मला प्रचंड आवडतं…’’ एवढं म्हणायचा अवकाश भटसाहेब आपल्या पहाडी आवाजात ‘गझल’ स्वरूपात ते गाणं मला ऐकवू लागले…
त्या तिथे फुलाफुलात पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढय़ात स्वप्न भंग…
मालवून टाक दीप…!!
यातला ‘हाय’ हा शब्द ज्या नजाकतीनं भटसाहेबांनी उच्चारला… ‘वा… क्या बात है? ‘हाय’! पुढे ते….
त्यांच्या नजाकतीत गातच होते…
गार गार या हवेत
घेऊनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग!
मालवून टाक दीप…!!
हे तुला कसे कळेल?
कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?
मालवून टाक दीप…
काय हा तुझाच श्वास?
दर्वळे इथे सुवास!
बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग!
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग!
राजसा किती दिसात लाभला निवांत संग!
वा भटसाहेब रासवट शृंगार गझलच्या अंगानं आपण म्हणालात, पण तरीही त्याच्या अद्वितीय अर्थाला जराही धक्का पोचत नाही!

आपले लाडके भाई पु. ल. देशपांडेंनी सुरेश भटांच्या ‘गझलांबद्दल विलक्षण तरलपणे म्हटलंय ‘सुरेश भटांना गझलचे मोठे आकर्षण आहे. कारण ‘गझल’ हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढंच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृत्ती मानत आलो. क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खऱया प्रवृत्तीची गोडीच कळत नाही!’ सुरेश भटांमध्ये सर्वांना हलवण्याची ताकद आहे. गझलमध्ये नाटय़ाचा मोठा अंश असतो. या गीत प्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे. एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्याला मजेदार धक्का देऊन जाते!

उर्दू शायरीत शब्दांची आतषबाजी कवितेला गुदमरवून टाकते… तसा प्रकार कवितेत नाही. भटांनी उगाचच उर्दू – फारसी शब्दांची पेरणी केली नाही आणि उगीचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. त्यांची कविता उमटते त्या अनुभूतीशी त्यांनी इमान कायम ठेवले आणि ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. त्यांची भूमिका ही जीवनातल्या नाटकात भूमिका करणाऱया प्रेक्षकांची आहे… म्हणूनच ते म्हणतात –
गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा…
रंगूनी रंगात साऱया रंग माझा वेगळा
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
रंगूनी रंगात साऱया रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा!

सुरेश भटसाहेब हे केवळ वैयक्तिक सुखदुःखाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दुःखे गात फुटावे असं त्यांना वाटत नाही. त्यात दुःख संताचे भिनावे अशी त्यांना ओढ आहे… आणि असल्या व्यापक दुःखाची जाणीव कवीला खऱया अर्थानं ‘कवी’ ही पदवी प्राप्त करून देत असते!…
माझिया गीतांत वेडे
दुःख संताचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे!
मी तुक्याच्या (तुकारामाच्या) लोचनानी
गांजल्यासाठी रडावे…
…आणि मग आम्ही किती दिवस निमूटपणे आमच्यावरील अन्याय सहन करून भेकडासारखे जगायचे? उठा! पेटवा मशाली –
उषःकाल होता काळरात्र झाली!
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
आज आम्ही स्वतंत्र आहोत? हा प्रश्न भटसाहेबांनी साठ वर्षांपूर्वी विचारला होता.
उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला!
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली…
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…
असं म्हणणारे भटसाहेब… एका वीर पुरुषाच्या बायकोने म्हटलेली विराणीही हळुवारपणे गातात… तो परत कधीच येणार नाही हे त्या सैनिकाच्या पत्नीला माहीत नाही… नवरा चिरनिद्रेत आहे…
तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजलास का रे?
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
बोल; शेजेच्या फुलावर तू असा रुसलास का रे?
राजसा निजलास का रे?
भटसाहेबांची मनोवृत्ती ही गझलांच्या भावविश्वाशी मिळती जुळती आहे… नुकतीच होळी झाली. तेव्हा भटसाहेबांच्या कवितेची सांगता आपण होळीच्या गीताने करूया…
आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!
सांग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले…
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले…!

वा! भटसाहेब, आपण आम्हाला कित्येक पिढय़ा पुरेल एवढं काव्य दिलं आहे, जे चिरंजीव आहे… काव्याला लाख लाख सलाम!

[email protected]