पोलीस प्रशासनाला कोरोना लस वेळेवर मिळत नाही, नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनपा आयुक्तांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला अटकाव करण्यासाठी नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱया पोलीस प्रशासनाला लस वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना पत्र पाठवून लसींचे डोस नियमित देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून ही लसीकरण मोहीम नगर जिल्ह्यामध्ये सुरू असून, नगर शहरामध्ये सात केंद्रे महापालिकेच्या अखत्यारीत येतात, तर 132 केंद्रे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात. तसेच पाच खासगी रुग्णालयांमार्फतही लसीकरण करण्यात येत आहे.

नगर महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सात रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱया व फ्रंटलाइन वर्कर्स असणाऱयांचे लसीकरण तत्काळ करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये पोलीस प्रशासनाचाही सहभाग आहे. त्यामुळे येणाऱया लसींच्या साठय़ातून किमान 10 टक्के लसी पोलीस विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, नगर शहरात पोलीस विभागाला वेळेवर लस मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना पत्र पाठविले आहे. यात पोलीस प्रशासनाला तत्काळ लसींचा पुरवठा करण्यात यावा, याबाबतचे नियोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनामध्ये दीड हजाराहून अधिकजण पहिल्या डोसपासून वंचित आहेत. त्यामुळे आता महापालिका यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.