
सामना प्रतिनिधी । लातूर
धाराशिव जिल्ह्यातील मौजे संभा येथील वीस वर्षाच्या युवकास पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणात अटक करण्यासाठी गेले असता तो अट्टल घरफोडीतील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. चोरीची मोटरसायकल दोन मोबाईल सोन्याची अंगठी आता सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. मुरुड पासून जवळ असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील मौजे सुंभा येथे एक युवक चोरीचा मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तिथे गेले. सुंभा येथील रहिवासी अक्षय बाळासाहेब शिंदे व 20 याला ताब्यात घेतले असता त्याने लातूर जिल्ह्यातील जातेगाव आणि मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचे दोन मोबाईल चोरीची टीव्हीएस मोटरसायकल एक सोन्याची अंगठी आणि रोख दोन हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले. त्यास मुरुड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आली असून पुढील तपास एक पोलीस निरीक्षक भालेराव हे करीत आहेत. या साठी पोलीस कर्मचारी राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नागनाथ जांभळे, राजेंद्र मस्के, रतन शेख, वाल्मीक केंद्रे, राजेंद्र कांचे यांनी परिश्रम घेतले.



























































