प्रियकराला नग्न फोटो पाठवले आणि ती फसली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिष बनसोडे । मुंबई

एका प्रवासामध्ये दोघांची ओळख झाली आणि पुढे जाऊन त्यांचे सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बेभान झाले. तरुणीने विश्वासाने प्रियकराला तिचे नग्न फोटो पाठवले, पण ते फोटो प्रियकराच्या मित्राच्या हाती लागले आणि प्रकरणच बिघडले. तो मित्र तरुणीला तिचे नग्न फोटो व्हायरल करायची धमकी देऊन पैसे देण्यासाठी धमकावू लागला. तरुणीने याबाबत तक्रार दिली आणि आग्रीपाडा पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

किशन गुप्ता (२२) आणि अविनाश गुप्ता (२०) अशी त्या दोघा भामटय़ांची नावे असून दोघेही कांदिवलीच्या पोयसर येथील झोपडपट्टीत राहतात. किशन हेल्परचे काम करतो तर अविनाश बेरोजगार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात आग्रीपाडा परिसरात राहणारी जुही (१९, नाव बदललेले) ही तरुणी तिच्या कुटुंबीयांसह बिहारला देवदर्शनासाठी गेली होती. ती ज्या बसने प्रवास करीत होती त्या बसमध्ये किशन क्लीनरचे काम करीत होता. तेथे दोघांची ओळख झाली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर दोघांचा संपर्क वाढला आणि त्यांचे सूत जुळले. प्रेमाच्या आणाभाका सुरू असतानाच किशनने जुहीकडे तिचे नग्न फोटो मागितले आणि जुहीने त्याला दिले.

मोबाईल हाती लागला अन्…

किशनचा मोबाईल अविनाशच्या हाती लागला आणि प्रेमप्रकरणात ट्विस्ट आला. दोघांनी मिळून मग जुहीला फोटो व्हायरल करायची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जुहीने आग्रीपाडा पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, एपीआय रत्ना खंडेवाल, पीएसआय जोष्टे, अंमलदार यशवंत नाईक, तुषार पवार, सचिन खानविलकर या पथकाने तत्काळ कांदिवली गाठून किशन आणि अविनाशला अटक केली.

पैसे मागायची आयडिया दिली

किशनच्या मोबाईलमध्ये जुहीचे नग्न फोटो बघितल्यानंतर अविनाशची नियत फिरली. त्याने जुहीचा मोबाईल नंबर आणि तिचे नग्न फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर त्याने या फोटोच्या आधारे जुहीकडून पैसे उकळूया अशी आयडिया किशनला दिली. मग दोघांची संगनमत करून प्लॅन केला. त्यानुसार अविनाशने जुहीला फोन करून तुझे नग्न फोटो माझ्याकडे असल्याचे धमकावून ४२ हजारांची मागणी केली. जुहीला विश्वास व्हावा म्हणून अविनाशने नग्न फोटो तिला पाठवले. त्यामुळे घाबरलेल्या जुहीने तेवढी रक्कम किशनकडे दिली. पैसे मिळाल्यामुळे दोघांची लालच वाढली आणि अविनाशने पुन्हा तिच्याकडे ५० हजारांची मागणी केली. पण यावेळी पैसे न देता जुहीने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्या दोघांचा डाव खल्लास झाला.