
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरच्या किश्तवार जिह्यात दहशतवादी लष्करासारखे कपडे परिधान करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे लष्कराचे कपडे परिधान करू नये आणि दुकानदारांनीही त्यांची विक्री करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरी सहभागाशिवाय दहशतवादाला आळा घालता येणार नसल्याने किश्तवार पोलिसांनी नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. लष्करी गणवेषासारखे कपडे तरुणांनी घातले नाहीत तर दहशतवाद्यांनाही त्याचा गैरवापर करता येणार नाही असे सांगतानाच तरुण पिढीने याबाबत सोशल मीडियावरून जनजागृतीही केली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ज्या दुकानदारांना लष्करासारखे कपडे विक्री करायचे आहेत त्यांनी त्यांची दुकाने लावण्यापूर्वी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे. दहा वर्षांपूर्वी किश्तवार जिल्हा हा दहशतवादमुक्त म्हणून जाहीर करण्यात आला होता, परंतु गेल्या वर्षीपासून तिथे पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. गेल्या नोव्हेंबर महिन्यात भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची हत्या झाली. तसेच गेल्या 9 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाची एका आरोग्य केंद्रात हत्या झाली होती.



























































