
विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीच्या बारसूत सोमवारपासून सुरू झालेले आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखीनच चिघळले. सशस्त्र पोलिसांची प्रचंड दमदाटी, दडपशाही आणि आंदोलक वृद्धा, महिलांवर लाठीचार्ज केल्याने आंदोलकांच्या संतापाचा भडका उडाला. शेकडो महिलांनी माती परीक्षणासाठी येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यासमोर स्वतःला झोकून दिले. ‘आमच्या अंगावर गाडय़ा घाला, आम्हाला गोळय़ा घाला, पण आम्ही प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय मागे हटणार नाही’, असा निर्धार करीत प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र आंदोलन चिरडण्याचा डाव आखलेल्या ‘ईडी’ सरकारने पोलिसांना आदेश देत शेकडो आंदोलकांना अक्षरशः गाडय़ांमध्ये कोंबून रत्नागिरी येथे नेले. यावेळी महिलांनी सरकारच्या जुलूमशाहीचा निषेध करत अन्यायाविरोधात टाहो फोडला.
कोकणचा निर्सग, फळबागा, मच्छीमारी- पारंपरिक व्यवसाय बुडवणारा प्रस्तावित ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प’ नाणारमधून हद्दपार झाल्यानंतर आता बारसू, सोलगावमध्ये सुरू करण्याचा घाट ‘ईडी’ सरकारने घातला आहे. मात्र बारसू, सोलगावसह पंचक्रोशी आणि संपूर्ण परिसरातील रहिवाशांचा प्रदूषणकारी प्रकल्पाला तीव्र विरोध असताना माती परीक्षणाच्या नावाखाली प्रकल्पाची सुरुवात करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याची माहिती मिळताच सोमवारी पहाटेपासूनच बारसू पंचक्रोशीतील हजारो रहिवासी कुटुंबकबिल्यासह प्रकल्पस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे बिथरलेल्या प्रशासनाकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलक दिवसरात्र या ठिकाणी ठाण मांडून आहेत. या ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज करून हटवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
मोबाईल हिसकावले, महिलांना फरफटत नेले
प्रकल्प हद्दपार झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत आंदोलन करणाऱ्या महिला, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी लाठीचार्ज करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी मोबाईल हिसकावून घेत ताब्यात घेतले. महिलांना अक्षरशः फरफटत पोलिसांच्या गाडय़ांमध्ये कोंबण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलक दीपक जोशी यांनी सांगितले.
कोकणात कुठेही प्रकल्प होऊ देणार नाही!
रिफायनरी प्रकल्प झाल्यास फळबागा, मच्छीमारी आणि पारंपरिक उद्योग-व्यवसाय बुडणार असल्याने हा प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प बारसूतच काय कोकणात कुठेही होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलक महिलांनी व्यक्त करीत प्रकल्पाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसमोर स्वतःला झोकून दिले.
आंदोलकांचा ठिय्या कायम
रिफायनरीविरोधी आंदोलन दडपण्यासाठी हजारो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अजूनही हजारो रहिवासी प्रकल्पाच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
पत्रकारांना धक्काबुक्की
बारसूत निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे विविध प्रसारमाध्यमांनीही प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेत आंदोलकांच्या भावना, सत्य स्थिती जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली, मात्र सरकार आणि पोलिसांची दडपशाही समोर येत असल्यामुळे या ठिकाणी वृत्तांकन आणि व्हिडीओ करण्यास प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली. काही माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला. यानंतर 10 ते 15 किमीवर प्रसारमाध्यमांना रोखण्यात आले. पुन्हा येथे दिसायचे नाही, असा पोलिसांनी त्यांना दम भरला. रत्नागिरीतील पत्रकारांनी या प्रकाराचा निषेध केला असून त्यांनी काळय़ा फिती लावून काम केले.
आंदोलकांचे तंबू उखडून फेकले
डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही आंदोलकांनी भरउन्हात प्रकल्पाच्या ठिकाणी ठिय्या मांडला आहे. यामुळे अनेक महिला, आंदोलकांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आंदोलकांकडून महिला, मुलांसाठी छोटे मंडप उभारण्यात आले होते. मात्र पोलिसांनी हे मंडप उखडून फेकून दिल्याचे आंदोलक श्रीकांत सोडये यांनी सांगितले.
सशस्त्र पोलिसांचा वेढा
बारसूत होणाऱ्या विनाशकारी रिफायनरीचा फटका बसणाऱ्या सोलगावसह शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे, धोपेश्वर पंचक्रोशीत आंदोलनाचे लोण पसरले आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी बंदूकधारी पोलिसांसह अश्रुधुराच्या नळकांडय़ा, गॅस, लाठय़ा असलेल्या पोलिसांच्या गाडय़ा दिवसरात्र फिरत असून नाक्यानाक्यावर सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.
माती परीक्षण सुरू
कोकणवासीयांचा तीव्र विरोध, आंदोलन सुरू असताना सरकारने दडपशाही करीत बारसू येथे दुपारनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात माती परीक्षण सुरू केले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच आंदोलकांनी सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. या व्हिडीओत ड्रिलिंग सुरू असल्याचे दिसत आहे. प्रकल्पस्थळावरील कोणतीच घटना व्हायरल होऊ नये यासाठी पोलीस आता प्रत्येकाचाच मोबाईल हिसकावून घेत आहेत.
































































