पोलीस डायरी : दाऊद, छोटा शकील कधी संपणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

कश्मीरमधील पुलवामा येथे 40 जवानांची हत्या केल्यानंतर आपल्या हवाई दलाच्या विंग कमांडरनी पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या हेडक्वॉर्टरवर हल्ला केला व तेथे असलेल्या 250 ते 300 अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर ठार झाला की नाही यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तो जिवंत असल्याचे सांगण्यात येते. हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या या जबरदस्त ऍटॅकचा पाकिस्तानवर काहीतरी परिणाम होईल असे वाटले होते, परंतु पाकिस्तानच्या वर्तणुकीत फारसा फरक पडलेला नाही. उलट हिंदुस्थानच्या सीमेजवळ पाकिस्तान आज रोजच गोळीबार करीत आहे. त्यांचे अतिरेकी आपल्या जवानांना टार्गेट करीत आहेत. आजाद कश्मीरसाठी पाकिस्तानचा गेल्या 70 वर्षांपासून हा आतंक सुरू आहे.

अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्याचा मौलाना मसूद अजहरचा हा कॅम्प पाकिस्तानातील पंजाब बहावलपूरच्या पहाडी भागात असून तेथे धर्माच्या नावाखाली radicalize झालेल्या, बहकलेल्या जगभरातील मुस्लिम तरुणांना 50 दिवसांचे शस्त्र्ा कशी चालवावीत, बॉम्ब, आरडीएक्सचा स्फोट कसा घडवून आणायचा आदी कारवायांचे खडतर प्रशिक्षण पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी देतात. त्यानंतर प्रशिक्षण घेणारे हे तरुण अतिरेकी म्हणूनच बाहेर पडतात आणि जगभरात बॉम्बस्फोट घडवितात. जगभरातील इच्छुक तरुणांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठविले जाते. त्यावेळी त्या तरुणांचा ना व्हिसा तपासला जात ना त्यांचा पासपोर्ट! कोणतीही नोंदणी न करता या तरुणांना जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पमध्ये अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जाते. हे सारे पकडण्यात आलेल्या प्रत्येक अतिरेक्यांच्या कबुलीजबाबात आतापर्यंत उघड झालेले आहे. तरीही अद्याप पाकिस्तानवर हवी तशी ठोस कारवाई कोणत्याही देशाने केलेली नाही. अगदी अमेरिकेवर हल्ला करणारा ओसामा बिन लादेन जिवंत सापडूनही! मुंबईसह देशभरातून महाराष्ट्र एटीएस व एनआयएच्या तपास यंत्रणांनी देशभरातून 500 च्या वर redicalize झालेल्या मुस्लिम तरुणांना आजपर्यंत अटक केलेली आहे. तरीही ‘जन्नत’च्या… धर्माच्या नावाखाली वाया गेलेले मुस्लिम तरुण आजही दुबईमार्गे पाकिस्तानात जात आहेत व हिंदुस्थानविरोधात जिहाद पुकारत आहेत.

1993 च्या मुंबईतील महासंहारक बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी मुंबईच्या आग्रीपाडा भागात राहणाऱया डॉ. जलीस अन्सारीने छोटे मोठे असे 52 बॉम्बस्फोट मुंबईसह देशभरात घडवून आणले होते. अहले-अदीस पंथाच्या या डॉक्टरने आपल्या पंथातील मुस्लिमांचा बॉम्बस्फोट घडविण्यासाठी त्यावेळी वापर केला होता. 1994 साली डॉक्टर अन्सारी पकडला गेला आणि अहले-अदीस पंथाच्या बॉम्बस्फोट मालिका थांबल्या. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी डॉक्टर अन्सारीने स्थानिकांचीच मदत घेतली होती. तो स्वतःच बॉम्ब बनवायचा आणि स्वतःच फोडायचा.

1993 सालच्या बॉम्बस्फोट मालिकेसाठी मुंबईतून 27 जणांना पाकिस्तानात ट्रेनिंग घेण्यासाठी पाठविण्यात आले होते.  पाकिस्तानच्या पहाडी भागांत पाकिस्तानी आर्मीच्या अधिकाऱयांनी मुंबईतील जोगेश्वरी, बेहराम बाग, बेहराम पाडा आदी भागांतील तरुणांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले होते. तेव्हा पाकिस्तानात जे काही अतिरेकी कॅम्प आहेत ते सरकारमान्य आहेत. तेथे लष्करी अधिकारी जगभरातील मुस्लिम तरुणांना ‘ट्रेनिंग’ देतात. युद्धात चारवेळा मार खाल्लेल्या पाकिस्तानची हिंदुस्थानबरोबर थेट युद्ध पुकारायची औकात नसल्याने पाकिस्तानी लष्कर अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन हिंदुस्थानविरुद्ध छुपे युद्ध खेळत आहे व आपल्या देशात आतंक माजवत आहे.

दाऊद, छोटा शकील, अनिस इब्राहिम आदी 200च्या वर हिंदुस्थानी गुंड आज पाकिस्तानात आहेत. त्यांचे आपल्या हिंदी सिनेसृष्टीवर वर्चस्व आहे. बांधकाम व्यवसायात विशेषतः दक्षिण मुंबईत दाऊचेच बिल्डर मोक्याच्या जागा काबीज करून करोडो रुपये कमवीत आहेत. ठाणे ग्रामीण व शहरी भागात आपल्या मार्गात आडव्या येणाऱया बांधकाम व्यावसायिकांना धमक्या देणाऱया दाऊदच्या भावाला (इक्बाल कासकर) ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व त्यांच्या सहकाऱयांनी मध्यंतरी अटक करून दाऊदच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पाडला होता. त्यामुळे दाऊद व त्याची टोळी आजही सक्रिय आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडविणारे दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम, छोटा शकीलसारखे देशद्रोही जोपर्यंत पाकिस्तानात आहेत तोपर्यंत हवालामार्फत करोडोंचा मलिदा पाकिस्तानात जातच राहणार आहे आणि त्या पैशातून अतिरेक्यांना शस्त्र पुरविली जाणार आहेत. मसूद अजहरप्रमाणे जोपर्यंत दाऊद, छोटा शकील, अनिससारख्या देशद्रोही गुंडांवर सर्जिकल स्ट्राईक होणार नाही तोपर्यंत या देशातील गद्दारांना धडा मिळणार नाही. दाऊद इब्राहिम हीच आयएसआयची खरी अर्थवाहिनी आहे. हे आयबी, रॉसारख्या गुप्तचर यंत्रणांना माहीत नाही का? मग दाऊदचे कंबरडे कधी मोडणार?

दाऊद हा अमली पदार्थांच्या तस्करीत आहे. अर्थात, त्याच्याइतका पैसा पाकिस्तानातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीकडे नाही. अमली पदार्थांचा पुरवठा करून त्याने व आयएसआयने आपल्या देशातील तरुण पिढीला बरबाद करण्याचा विडा उचलला आहे. पंजाबची बहुसंख्य तरुण पिढी आज अमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. हे सारे अगदी शांतपणे पाकिस्तान करीत आहे व आपण कुंभकर्णासारखे झोपून आहोत. लाखो बांगलादेशींची हत्या करणाऱया पाकिस्तानचा इस्लामशी काहीही संबंध नाही. मुस्लिमांच्या सर्वात जास्त हत्या पाकिस्ताननेच घडवून आणल्या आहेत. अमेरिका, चीनने आर्थिक मदत थांबविल्यास पाकिस्तान नेस्तनाबूत होईल. दहशतवाद थांबविण्याच्या नावाखाली पाकिस्तान परदेशी मदत घेते आणि त्याच पैशातून दहशतवाद वाढवीत आहे हे आता थांबले पाहिजे.

[email protected]