
>> प्रभाकर पवार
कुणाल कोचरेकर हा उच्चशिक्षित तरुण वसईत राहतो. या तरुणाला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे सांगून मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गरजू तरुणांना उल्लू बनविण्याचे दुकान थाटून बसलेल्या एका दांपत्याने आतापर्यंत 12 लाख रुपयाला फसविले असल्याचे त्याने दै. ‘सामना’ कार्यालयात येऊन आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. कुणाल म्हणतो, गेल्या तीन वर्षांपासून आपणास कधी कॅनडा, कधी युरोप, कधी जर्मनी, स्पेन अशा देशांची नावे सांगून या दांपत्याने आपल्याकडून लाखो रुपये उकळले आहेत, व्हिसा मिळाल्याचे सांगून गंडवले आहे. या फसवणुकीबाबत कुणालने चारकोप पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. परंतु मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी परदेशात नोकरी देतो असे सांगून बेकार तरुणांना फसविणाऱया या पती-पत्नीविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. जॉब रॅकेट चालविणाऱया त्या महिलेच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे कुणीही अधिकारी तिला पोलीस ठाण्यात बोलाविण्यास धजावत नाही. याचाच फायदा घेऊन ती महिला व तिचा पती परदेशात नोकरी देतो असे सांगून तरुणांना फसवत आहेत, असेही कुणालचे वडील नाना कोचरेकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले. पोलीस ठोस कारवाई करीत नाहीत. पोलिसांवर तपास करण्याच्या मर्यादा आहेत. त्याचाच फायदा आज देशभरातील लफंगे घेत आहेत. चारकोप पोलीस न्याय देत नाहीत आणि घेतलेले पैसे चिटिंगचे दुकान उघडून बसलेले दांपत्य परत देत नाहीत. त्यामुळे कुणाल वैफल्यग्रस्त झाला आहे. परदेशात जाण्यासाठी, नोकरी मिळविण्यासाठी त्याने 10 लाखांचे कर्ज काढले होते. ते कर्ज आता कसे फेडणार या चिंतेत कुणाल असून तो आत्महत्या करण्याच्या मनःस्थितीत आहे, असे त्याचे निकटवर्तीय सांगत आहेत.
मुंबईसह देशभरात, परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींना फसविले जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात असतानाच अमेरिकेतील बनावट विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या अमेरिकेच्या इमिग्रेशन व कस्टम (आयसीई) पोलिसांनी जगभरातील 250 हून विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यात हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या आठवडय़ातील ही घटना आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फॉर्मिटन असे या विद्यापीठाचे नाव असून हे विद्यापीठ बोगस आहे. हे माहीत असूनही परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असे अमेरिकेचे म्हणणे आहे, तर हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना फसविण्यात आले आहे असा दावा हिंदुस्थानी वकिलांनी केला आहे. तेव्हा परदेशात नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांनी परदेशातील विद्यापीठे अधिकृत की अनधिकृत याची खात्री करून घेतली पाहिजे. त्यानंतरच स्टुडंट व्हिसासाठी प्रयत्न केले पाहिजेत बंद असलेल्या कॉलेज व विद्यापीठांच्या डिग्र्या काही डॉलर दिल्यानंतर मिळतात व त्या बोगस डिग्र्यांच्या नावावर हिंदुस्थानात नोकऱया मिळविल्या जातात. असे मोठे रॅकेट असून परदेशातील डिग्र्यांची तपासणी केल्यास बहुसंख्य जणांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागतील असे सांगण्यात येते. परदेशातील पीएचडीच्या (डॉक्टर) डिग्र्या पूर्णपणे संशयास्पद आहेत. तेव्हा जनहो, परदेशात जाऊन कुणाच्या तरी जाळ्यात अडकण्यापेक्षा आपल्या देशातच हिंदुस्थानी तरुणांनी नोकरीसाठी व व्यवसायासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु आपल्याकडे परदेशी नोकऱयांची ‘क्रेझ’ आहे. त्यात अमेरिकेसारख्या बलाढय़ देशात जाऊन स्थायिक होण्याचे बऱयाच तरुणांचे स्वप्न असते, परंतु गेल्या आठवडय़ात सुमारे 150 हून अधिक हिंदुस्थानी तरुणांचे हे स्वप्न भंगले. त्यांना ज्या विद्यापीठात शिकविले जात नाही, कुणी शिक्षकही नाही अशा बोगस विद्यापीठात प्रवेश घेतल्याच्या व इमिग्रेशन रॅकेटमध्ये सामील असल्याच्या संशयावरून अमेरिकन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची मायदेशी रवानगी केली आहे.
अलीकडे अमेरिकेत जाण्याचे फॅड प्रचंड वाढले आहे. त्यामुळे बरीच मुलं गैरमार्गाने अमेरिकेत घुसतात. त्यामुळे ती कधी मायदेशी परतत नाहीत. अगदी आईवडिलांना वृद्धापकाळात भेटायला किंवा आईवडील गचकल्यावर बरेचजण अंत्यविधीलाही पोहचत नाहीत. विमानतळावर इमिग्रेशन तपासणीमध्ये पकडले जाऊ, आपली नोकरी जाईल या भीतीने बरेचजण हिंदुस्थानात परत येत नाहीत. परदेशातच स्थायिक होतात. तेव्हा बनावट कागदपत्रे तयार करून परदेशात जाणाऱयांनो, आपल्या देशातही सुबत्ता आहे. एकटा अमेरिका हा काही समृद्ध देश नाही. ते चंगळवादी राष्ट्र आहे. तेथे भरपूर श्रीमंती आहे हा समजही खोटा आहे. तेथेही गरिबी व दारिद्रय़ आहे हे लक्षात ठेवा. आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत आपल्या महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे, परंतु अमेरिकेच्या वेडापायी परदेशात नोकरी मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. परदेशात गेल्यानंतर कुणावर ‘डिपोर्ट’ करण्याची वेळ येऊ नये. जे गेल्या आठवडय़ात अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले तसे घडू नये. वसईच्या कोचरेकरवर ती वेळ आली नाही, परंतु त्याने 12 लाख रुपये गमावले हे काही कमी नाही. कांदिवली (प.) चारकोप मार्केट येथील सनरेज मार्केटमध्ये एक दांपत्य खुलेआम नोकरी देतो असे सांगून तरुणांना आयुष्यातून उठवते. तरी आमचे चारकोप पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत नाही याला काय म्हणावे? अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, उपायुक्त डॉ. मोहन दहिकर यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यास त्या दांपत्याचे जॉब रॅकेट उद्ध्वस्त केल्यास लोकांची होणारी संभाव्य लुबाडणूक नक्कीच थांबेल.




























































