पोलीस डायरी : निवडणुका आल्या; बनावट नोटा आणि काळय़ा पैशाचा महापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर  आचार-संहिता सुरू झाली. पक्षांवर-उमेदवारांवर बंधने आली. खर्च करण्यावरही मर्यादा आल्या. त्यामुळे मतदारांना आमिष दाखविणाऱ्या किंवा पैशाचे वाटप करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होत असून गेल्या 15 दिवसांत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छुप्यारीतीने वाहनांमधून नोटांची ने-आण करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्राभर गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. बीड जिह्याच्या पाटोदा तालुक्यातील अमळनेरजवळ संशयास्पद गाडी अडविली असता त्या कारमध्ये दोन कोटी रुपयांची रोकड आढळून आली. ज्यांच्याकडे ही रक्कम होती त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही रोकड आयकर विभागाकडे सोपविली असून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नागपूर येथील सावनेर तालुक्यातील सिटोजा पोस्ट, पाटोदा तालुक्याजवळील अंमळनेर, चंदगड, नगर, शिरपूर, सोलापूर आदी ठिकाणी चेकपोस्ट येथे संशयास्पद वाहने अडवून त्यातून कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. कुणाकडे 80 लाख, कुणाकडे 50 लाख, कुणाकडे 10 लाख, 84, 23 लाख आदी कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी रोकड ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींकडून जप्त केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये कोटय़वधी रुपयांच्या काळय़ा पैशांचे वाटप होणार असल्याचे प्रचार सुरू होण्याआधीच उघडकीस आले आहे. मधल्या दलालांची, कार्यकर्त्यांची व मतदारांची या लोकसभा निवडणूक काळात भलतीच चांदी होणार आहे. एजंट मालामाल होणार आहेत नव्हे होतातच!

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सर्वत्र नाकेबंदी करून रोख रकमेची ने-आण करणाऱ्या अंगडियांची, हवालामाफियांची पूर्णपणे गोची केली आहे. आपल्या स्वतःच्या व्यवहाराची रोख रक्कम कुठे पोहोचवायची असेल, न्यायची असेल तर निवडणूक काळात त्याची वाहतूक करणे फारच जिकिरीचे काम आहे. बँकेतून रोख रक्कम काढल्याची पोचपावती किंवा कागदपत्रे जवळ असतील तरच त्याची ने-आण करा असे पोलीसच सांगत आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची महाराष्ट्रभर कारवाई सुरू असतानाच मुंबई क्राइम ब्रँचच्या महेश देसाई, चिमाजी आढाव, संजय निकुंबे या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भायखळा, कांदिवली-चारकोप आदी ठिकाणी छापा मारून 2000 हजार, 500, 200 आदी रकमेच्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. नोटा छापण्यासाठी काही आरोपींनी स्कॅनर्स व प्रिंटरची खरेदी केली होती. स्कॅन केलेल्या नोटांचे बाजारात वितरण करण्यापूर्वीच पोलीस हवालदार अविनाश शिंदे यांनी आपले वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांना खबर देऊन छापा मारला आणि यंत्रसामग्री जप्त केली, तर भायखळा येथून जप्त केलेल्या बनावट नोटा बांगलादेशातून पश्चिम बंगालमार्गे मुंबईत आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर सीमेपलीकडून पुन्हा हिंदुस्थानी चलनातील बनावट नोटांचे जाळे पाकिस्तानने पसरले आहे की काय याचीही चौकशी सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपायुक्त दिलीप सावंत, अकबर पठाण या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यावर हिंदुस्थानी चलनातील हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठय़ा प्रमाणात बाजारात फिरत असल्याचे व त्याचा वापर अतिरेकी व नक्षलवादी करीत असल्याचे उघड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी चलनातील 500 व 1000 रुपयांच्या नोटांवर 2016 साली बंदी आणली. याचा जबरदस्त फटका नक्षलवाद्यांना बसला. त्यांच्याकडे असलेल्या करोडो रुपयांच्या नोटांचा कागद झाला आणि त्यांची चळवळ थंडावली; परंतु इस्लामी अतिरेक्यांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट नोटाबंदीनंतर त्यांच्या कारवाया अधिकच वाढल्या. कश्मीर पेटले.

नोटाबंदी झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने छापलेल्या नोटांपेक्षा अधिक नोटा 2016 पूर्वी बाजारात फिरत होत्या. त्यातील दोन लाख करोड नोटा या नकली असल्याचा संशय आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न चीन व पाकिस्तानकडून वारंवार केला जातो. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचचे कर्तव्यकठोर सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पश्चिम बंगालमार्गे हिंदुस्थानात येणाऱ्या नकली नोटांच्या मुळापर्यंत जाऊन आरोपींचे कंबरडे मोडायला हवे. स्थानिक दलालांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. ही कीड आहे. तुम्हीच हिचा नायनाट करू शकता. बनावट नोटा जोपर्यंत ‘बंद’ होणार नाहीत तोपर्यंत अतिरेकी व नक्षलवादी कारवायाही थांबणार नाहीत.