
सामना ऑनलाईन, नागपूर
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुद्दा आज नागपूर इथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित करण्यात आला. सर्वपक्षीय आमदारांनी भुजबळ यांना झालेल्या शिवीगाळीचा निषेध करत या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भुजबळांना ही शिवीगाळ केली आहे. भुजबळांशी काहीही संबंध नसताना भीमराव नलगे नावाच्या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत त्यांनी धिंगाणा घालत ही शिवीगाळ केली होती. या घटनेची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुजोर अधिकाऱ्यांवर टीका करताना म्हटलं की सचिव दर्जाची माणसं अशी वागतात जसं काय तेच मंत्रालय चालवत आहेत. सुनील प्रभू यांनी या विषयावर बोलताना म्हटले की बच्चू कडू यांच्याविरोधात जसं अख्खं मंत्रालय एकवटलं होतं, तसंच आमदाराचा अपमान झाल्यावर आपणही एकवटायला हवे. कोणत्याही आमदाराचा अपमान होत असेल तर अपमान करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ निलंबित केलंच पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली.
























































