
सामना प्रतिनिधी । मालवण
वेंगुर्ला महसूल व पोलीस प्रशासनाने कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाव वाडी येथे धडक कारवाई केली. यात दोन होड्या जाळण्यात आल्या तर दोन होड्या कर्ली खाडीत बुडवण्यात आल्या आहेत. यावेळी वाळू रॅम्पही तोडण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने वाळूची वाढती मागणी लक्षात घेता अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मालवण कालावल खाडी पात्रलगत हडी येथे मालवण महसूल पथकाने कारवाई केली होती. तर कर्ली खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी खनिकर्म विभागानेही कारवाई केली होती.
गुरुवारी सकाळी तहसीलदार शरद गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अनधिकृत वाळू उत्खननास वापर होत असलेल्या 4 होड्या नष्ट करण्यात आल्या. यापैकी दोन जाळल्या तर दोन खाडीत बुडवण्यात आल्या. तर अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले वाळू रॅम्पही उध्वस्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले तर काही पळून गेले. महसूल व पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून वाळू व्यवसाईकांचे धाबे दणाणले आहेत.




























































