खाकी वर्दी बनली माय, आई बापाने सोडलेल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली येथील कचरा कुंडीत आढळून आलेल्या नवजात बाळाची खाकी वर्दीच माय बनणार आहे. त्या बाळाचे नाव एमएचबी पोलीस ठाण्याची मुलगी असे ठेवले जाणार आहे. मुलीच्या भविष्याचा विचार करून पोलीस तिच्या नावाने पैसे बँकेत ठेवणार आहेत. त्या पैशातून मुलीचे शिक्षण केले जाणार आहे.

बोरिवली पश्चिमच्या शिवाजी नगर येथील साईबाबा मंदिराजवळ एक कचराकुंडी आहे. दोन दिवसांपूर्वी अज्ञात महिलेने तिचे बाळ त्या कचरा कुंडीत टाकून पळ काढला. त्या कचरा कुंडीत उंदरांचा वावर जास्त असतो. कचराकुंडीशेजारी एक बॅटरीचे दुकान आहे. रात्री बॅटरी दुकानाचा मालक आला. त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने कचराकुंडीजवळ बॅटरी मारली. तेव्हा त्याला कपडय़ात गुंडाळलेले बाळ दिसले. त्या कचरापुंडीजवळ कुत्रे आणि मांजरींचादेखील वावर अधिक असतो. मालकाने तत्काळ याची माहिती एमएचबी पोलिसांना दिली.

वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक शोभा यादव. मौले या घटनास्थळी आल्या. पोलिसांनी त्या बाळाला कचरापुंडीतून बाहेर काढले. काही तासापूर्वी जन्म झालेल्या त्या बाळाची नाळदेखील कापली नव्हती. पोलिसांनी त्या बाळाला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. बाळाच्या संगोपनाबाबत पोलिसांनी बालकल्याण समितीला पत्र व्यवहार केला आहे. बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्या बाळाला अंधेरी येथील एका संस्थेत ठेवले जाईल. त्या बाळाचे नामकरण केले जाणार आहे. तसेच तिच्या भविष्यासाठी पोलिसांनी काही रक्कम गोळा करण्यास सुरुवात केल्याचे उपनिरीक्षक वनिता कातबने यांनी सांगितले. ती रक्कम पोलीस बँकेत एफडी म्हणून ठेवणार आहे. त्या बाळाला सोडून गेल्या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच बोरिवली, कांदिवली येथील रुग्णालयात जाऊन चौकशी करत आहेत.