
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरात होळी आणि धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, काही समजाकंटकांनी या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील राजौरी गार्डनजवळ काही तरुण पाण्याने भरलेले फुगे पादचाऱ्यांवर फेकत होते. या तरुणांना फुगे फेकण्यापासून रोखणाऱ्या पोलिसावरच तरुणांनी हल्ला केला. त्यांच्यात वादावादी झाली त्यातून तीन तरुणांनी चाकूने पोलिसालाच भोसकले आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
अमित नारा हे निहाल विहार पोलीस ठाण्यात तैनात आहेत. होळीनिमित्त ते आपल्या एका मित्राकडे जात असताना रस्त्यात काही तरुणांनी त्यांच्यावर पाण्याने फुगे फेकले.आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. तरुणांनी रागाच्या भरात नारा यांच्या पोटात चाकू भोसकला. नारा यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्ला करणाऱ्या तीन तरुणांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































