शेतकऱ्यांनी उखडल्या डाळिंबाच्या बागा, डाळिंबावर तेल्या रोगांचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सटाणा

बागलाण तालुक्यातील मोसमखोऱ्यात डाळिंबावर मर आणि तेल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंब बागांना पाणी देणे मुश्कील होत असताना आता या रोगांमुळे बागा वाचवायच्या तरी कशा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या समस्येला कंटाळून अनेक शेतकरी मुळासहित डाळिंब बागा नष्ट करीत आहेत.

या गावांमधील शेतकरी मेटाकुटीला
तालुक्यात मोसम परिसर, कटवन, पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावे, तसेच लखमापयर, ब्राह्मगाव, ओदाने, तरसली, ताहाराबाद, अटपूर, जयखर्डा या भागांत मोठ्या प्रमाणात तेल्या व मर रागाने डाळींब खराब होत आहेत. परिणामी आधीच दुष्काळाने शेतकरी हैराण असताना डाळिंबामुळे शेतकरी वर्ग आणखी मेटाकुटीस आला आहे.

डाळिंबावरील तेल्या, मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले आहेत पाण्याअभावी सतत दुष्काळी परिस्थिती, कष्ट करूनही पिके हाती येत नाहीत. कर्जाचा सामना करावा लागत आहे. कर्ज काढून औषधे, फवारणी, खर्च करूनही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदीनाले, विहिरी कोरडेठाक पडल्या आहेत सात महिने अगोदरच पिण्याच्या पाण्याची टंचाई-उन्हाळा सुरू होण्याआधीच भासू लागली आहे. शेतकऱ्यांनी डाळिंब बागा नष्ट करून आपला मोर्चा भाजीपाला, कांदा पिकाकडे वळवला. कांदा लागवडही मोठ्या प्रमाणात केली गेली. मात्र भाजीपाला पिकाला व कांद्याला ही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सद्या डाळिंबाला भाव असला तरी अन्य बागा शेतकऱ्यांनी राखून ठेवल्या होत्या, परंतु तेल्या व मर रोगामुळे व पाण्याअभावी शेतकरी बागा नष्ट करत आहेत. लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करीत आहेत. आंतरी पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे. फ्लावर, कोबी, मेथी, टोमॅटो या भाजीपाला पिकालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

डाळिंबाच्या पिकाने तालुक्याला सावरले होते. त्याच पिकाची आता वाताहत होत आहे. द्राक्ष, डाळिंब या पिकांना निसर्गासोबतच विविध रोगांनी त्रस्त केले आहे. डाळिब बाग नेस्तनाबूत होत आहे. शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नूकसान भरपाई देऊन शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकरी केशव माडवडे यांनी केली आहे.