तुम्हाला जिंकावेसे वाटतच नाही का? पॉण्टिंग भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चौथ्या दिवशी काही काळ झुंज दिली. पण नॅथन लायनला ज्या चेंडूवर बाद देण्यात आले तो निर्णय साशंक होता. अशा वेळी ऑस्ट्रेलियाकडे दोन डीआरएस शिल्लक असतानाही लायनने तो का वापरला नाही? तो सरळ मैदानाबाहेर निघून गेला. यावरून ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्याची किंवा वाचवण्याची अजिबात इच्छा नसल्याचे स्पष्ट दिसून येते, अशा शब्दांत माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने आपला राग व्यक्त केला.

पॉण्टिंग यावेळी मिचेल स्टार्कवरदेखील भडकला. लायनला बाद देण्यात आले तेव्हा मिचेल स्टार्क नॉन स्ट्राइकवर उभा होता. लायनने रिह्यू घेण्याबद्दल स्टार्कला विचारलेदेखील होते, पण स्टार्कने सरळ हात झटकले आणि निर्णय लायनवर ढकलला. ही बाब मला जास्त खटकली, असे पॉण्टिंग म्हणाला. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे 2 गडी शिल्लक होते. त्यामुळे रिह्यू घेतला असता आणि तो चुकीचा ठरला असता तरीही ऑस्ट्रेलियाचे फारसे नुकसान झाले नसते. अशा वेळी आशाच सोडून देणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे पॉण्टिंगला वाटते.