पीओपीच्या गणेशमूर्तींचे रिसायकलिंग होणार; 24 तासांत मुलुंडला पाठवल्या जाणार मूर्ती, इच्छुक संस्थांकडून पालिकेने मागवले अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनाने नैसर्गिक जलस्रोतांचे नुकसान होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिकेने पावले उचलली आहेत. पालिकेने विसर्जित मूर्तींचे संकलन, सुरक्षित साठवणूक, शास्त्रीय प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी एकात्मिक कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात सर्व विभागीय साहाय्यक आयुक्तांना एसओपी (SOP) जारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव, तात्पुरते विसर्जन तलाव आणि जलाशयांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक विभागाने स्वतंत्र समन्वय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ, वैयक्तिक सुरक्षा साधने, क्रेन आणि योग्य प्रकारे आच्छादित वाहने उपलब्ध करावीत. बाहेर काढलेल्या मूर्ती केवळ निश्चित केलेल्या मुलुंड येथील साठवणूक सुविधेपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचवण्यात येतील.

  • महापालिकेने सुमारे २,८५० मेट्रिक टन पीओपी गणेशमूर्तींच्या साहित्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनुभवी संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादारांकडून ‘स्वारस्य अर्ज’ (Expression of Interest) मागवले आहेत.

  • इच्छुक संस्था कॅल्सिनेशन, रासायनिक विघटन किंवा अन्य शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित व पर्यावरणीय नियमांशी सुसंगत तंत्रज्ञान प्रस्तावित करू शकतात.

  • प्रक्रिया केलेल्या साहित्याचा नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगात ‘फिलर’ म्हणून पुनर्वापर करता येऊ शकतो.

  • पात्र संस्थांची पुढील निविदा प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. स्वारस्य अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २९ सप्टेंबर २०२६ ही आहे.