
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवईच्या आयआयटी मुंबईत एक वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारींचा सोशल मीडियावर पाऊस पडत आहे. अनेक तक्रारी आयआयटी प्रशासनाकडेही आल्या आहेत; परंतु या निनावी तक्रारींची दखल घेण्यास आयआयटीने स्पष्ट नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने शोषण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावानिशी तक्रारी कराव्यात, जेणेकरून पोलीस तक्रार करून पुढील चौकशी करणे सुलभ होईल असे आयआयटीने म्हटले आहे.
लैंगिक शोषण करणारा विद्यार्थी हा वसतिगृहात विद्यार्थ्यांशी चाळे करत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या मार्चपासून सुमारे 17 विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्याचे आयआयटी प्रशासनाकडून समजते. गेल्याच आठवडय़ात विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंटस् अफेअर्स’ विभागाचे अधिष्ठाता सौम्यो मुखर्जी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या; परंतु या तक्रारी मित्रांच्या माध्यमातून आणि निनावी केल्या जात असल्याने नेमके कोणत्या विद्यार्थ्यांचे शोषण होतेय याची खात्रीशीर माहिती मिळत नसल्याचे मुखर्जी यांचे म्हणणे आहे. ज्या विद्यार्थ्याबद्दल तक्रारी आहेत त्याला आयआयटीच्या ‘मुड इंडिगो’ महोत्सवाची प्रमुख जबाबदारी सोपवली गेली आहे. त्याला तेथून हटवा अशी मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनीही केली आहे. परंतु प्रशासनाने तक्रारदार विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे पुढे यावे असे सांगण्याशिवाय अन्य पाऊल उचललेले नाही.


























































