
सामना ऑनलाईन,मुंबई
मुंबापुरीत उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारती आणि मेट्रो रेल्वे, इमारतींमधील एसीच्या प्लाण्टमुळे मुंबईकरांच्या विजेची भूक वर्षाला 150-175 मेगावॅटने वाढणार आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीवर होणार असल्याचा अहवाल राज्य भार प्रेषण केंद्र (एसएलडीसी) या विजेचे नियोजन करणाऱ्या संस्थेने दिला आहे.
मुंबई शहरात बेस्ट तर उपनगरात टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी, आणि महावितरण वीज वितरण करत आहेत. सध्या एकूण ग्राहकांची संख्या सुमारे 50 लाखांच्या घरात असून त्यांची विजेची कमाल मागणी 3500 मेगावॅट आहे. गेल्या दहा वर्षांपासून अल्प प्रमाणात वाढणारी विजेची मागणी यापुढे वर्षाला दीडशे ते पावणेदोनशे मेगावॅटने वाढेल असे स्पष्ट केले आहे.
क्षमता वाढवण्याचे एमईआरसीचे निर्देश
मुंबईची सध्याची विजेची मागणी आणि मुंबई परिसर व राज्यातून वीज आण्यासाठी उपलब्ध असलेल्या वीज वाहिन्यांची क्षमता जवळपास सारखीच आहे. त्याची गंभीर दखल घेत एमईआरसीने मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या उच्च दाब वाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.




























































