प्रबोधनकारांचे ज्वलंत विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शक; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाज सुधारणा करण्याचा ठरावीक असा कोणताही कालखंड नसतो. प्रत्येक कालखंडात समाज सुधारणेची आवश्यकता असतेच. त्यामुळेच समाज सुधारक, प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाणी आणि लेखणीतून उतरलेल्या प्रखर आणि ज्वलंत विचारांची ओळख सात पुस्तकांच्या संचाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला होईल, प्रबोधनकारांचे विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन शिवसेना नेते, उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले. गिरगावच्या विल्सन महाविद्यालयात आज उद्योगमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील 85 मुख्याध्यापक, प्राचार्यांना प्रबोधनकारांच्या 7 पुस्तकांचा संच त्याचबरोबर साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दैनिक ‘सामना’चा पहिला अंक भेट म्हणून देण्यात आला.

दक्षिण मुंबई शिवसेना, युवासेना आणि युवा व्हिजन यांच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच ‘प्रबोधनातून प्रबोधन’ हा उपक्रम राबवला जात आहे. ‘प्रबोधन’ नियतकालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त थोर समाजसुधारक, लेखक, चित्रकार, नाटककार, छायाचित्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. शाळा, महाविद्यालये, रात्रशाळा यांच्या बरोबरीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथसंग्रहालयांना प्रबोधनकारांची पुस्तके भेट दिली जाणार आहेत. दरम्यान, मुंबईत मरीन ड्राइव्ह येथे बांधण्यात येत असलेल्या मराठी भाषा भवनाला प्रबोधनकार मराठी भाषा भवन असे नाव देण्यात यावे आणि प्रबोधनकारांच्या लेखांचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी विनंती दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केली.

यावेळी शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, जॉन विल्सन शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. तुकाराम शिवारे, विल्सनच्या प्राचार्या ऍना निकाळजे, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल देवरुखकर-शेठ, राजन कोळंबेकर, सुप्रिया करंडे, शशिकांत झोरे, महादेव जगताप तसेच युवासेना युवा अधिकारी आणि युवा व्हिजनचे अध्यक्ष प्रथमेश सकपाळ, अल्केश मेहेत्रे, हेमंत दुधवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.