
मुलाखत – जयेंद्र लोंढे
29 ऑगस्ट… हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. हिंदुस्थानात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक सात पदके जिंकली. अमेरिका, चीन या देशांनी पटकावलेल्या पदकांच्या तुलनेत ही कामगिरी तोकडीच, पण टोकियोतील कामगिरीमुळे हिंदुस्थानला भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल असे गृहीत धरायला हरकत नाही. याच प्रसंगी हिंदुस्थानातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ऑलिम्पिकपटू निर्माण होत असतानाच महाराष्ट्र मागे का पडत आहे? मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत क्रिकेट वगळता इतर खेळांमधून खेळाडू का घडत नाहीत? हे प्रश्न यावेळी उभे ठाकले आहेत. यावेळी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मुंबईसह महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील परिस्थितीबाबत जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
एकीकडे पंजाब, हरयाणा यांसारख्या राज्यांमधून ऑलिम्पिकपटू निर्माण होत असतानाच महाराष्ट्रामधून मोठय़ा संख्येने ऑलिम्पिकपटू तयार का होत नाहीत?
– पंजाब, हरयाणा येथून ऍथलीट, कुस्तीपटू मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असतात. प्रत्येक खेळाची स्पेशालिटी असते. महाराष्ट्रात ऍथलेटिक्ससाठी लागणारे अव्वल दर्जाचे ट्रक नसावेत. ऍथलेटिक्स प्रशिक्षकही उपलब्ध नसावेत. बॅडमिंटन व नेमबाजी या खेळांमध्ये महाराष्ट्र बऱयापैकी अग्रेसर आहे, पण महाराष्ट्रात साईकडून सर्व प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध असलेले सेंटर नाही. याचा फटका महाराष्ट्राला बसतो आहे. पुलेला गोपीचंद व प्रकाश पदुकोण ऍकॅडमीत खेळाडूंना कसून सराव करायला मिळतो. सरकारकडूनही याला सहकार्य लाभते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सेंटरची कमतरता प्रकर्षाने जाणवते.
महाराष्ट्रातील क्रीडा परिस्थितीबाबत काय सांगाल?
– महाराष्ट्रात गुणवत्तेबाबत प्रश्न नाही. अफाट टॅलेंट आपल्याकडे आहे, पण जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकतील अशा खेळाडूंवर फोकस ठेवायला हवा. त्यानंतर हेच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करू शकतील. शालेय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱया विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल याकरिता पावले उचलायला हवीत. याचमुळे पालकांचाही आत्मविश्वास नक्कीच उंचावेल व ते आपल्या मुलांना खेळामध्ये करीअर करण्यापासून रोखणार नाहीत.
सरकार व कॉर्पोरेट सेक्टरच्या सहकार्याने खेळ व खेळाडूंच्या प्रगतीला वेग येईल असे वाटते का?
– हो. नक्कीच. ज्या कंपन्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करतील त्यांच्यासाठी सरकारकडून पावले उचलायला हवीत. केंद्र सरकारकडून अशा कंपन्यांसाठी इन्कम टॅक्समध्ये सूट द्यायला हवी. राज्य सरकारकडूनही ऑलिम्पिकपटू घडवणाऱया कंपन्यांसाठी विशेष सवलत द्यायला हवी. असे झाल्यास कंपन्याही खेळाडूंना सेवेत घेण्यास इच्छुक होतील. खेळाडूंच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्नही यावेळी सुटेल.
विविध खेळांसाठी मुंबईसह महाराष्ट्रात अत्याधुनिक ऍकॅडमीची स्थापना करायला हवी का?
– मुंबईत ऍकॅडमीसाठी जागा उपलब्ध असण्याची शक्यता कमीच आहे, पण नवी मुंबईत ऍकॅडमीची उभारणी करू शकतो. मुंबईत असंख्य ठिकाणी खेळांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येऊ शकतील. जे हॉल्स रिकामे आहेत, काही शाळांनजीक जमिनींवर काहीही होत नाही. अशा ठिकाणी खेळांसाठी प्राधान्य देण्यात येऊ शकते.
शाळांमधून खेळाचा प्रसार व प्रचार व्हायला हवा असे वाटते का?
– शाळांमधूनच खेळांचा प्रसार व प्रचार व्हायला हवा. शाळांमध्ये खेळ हा विषय सक्तीचा करायला हवा. थिअरी व प्रॅक्टिकल असे दोन विषय असायला हवेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमधून खेळांची गोडी निर्माण होईल. लहानपणापासूनच एखादा विद्यार्थी विशिष्ट खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकेल. हाच विद्यार्थी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करू शकेल.
खेळाडूंच्या विम्याबद्दल काय सांगाल?
– जिल्हास्तरीय स्पर्धांपासून त्यापुढील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया खेळाडूंकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अशा खेळाडूंचा विमा महाराष्ट्र राज्याने काढायला हवा. जेणेकरून त्याला पुढे दुखापत झाली तर त्या विम्याच्या सहाय्याने त्याला मदत होऊ शकेल. त्याच्या कुटुंबीयांवर ताण पडणार नाही.
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे भविष्याबद्दल तुमचे मत सांगा…
– शालेय स्तरापासून कॉलेज स्तरापर्यंत सर्वच ठिकाणी खेळाडूंना विशेष सवलत देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना खेळ व अभ्यास याची योग्य सांगड घालता यायला हवी. क्रीडा संघटना, सरकार, कॉर्पोरेट यांसारख्या घटकांनी खेळाडूंसाठी सोयीसुविधा, प्रशिक्षक नियुक्ती यांसारख्या बाबींवर लक्ष द्यायला हवे. यानंतरच महाराष्ट्रामधून अधिकाधिक ऑलिम्पिकपटू घडतील तसेच भविष्यात या भूमीतून ऑलिम्पिक पदक विजेतेही निर्माण होतील.


























































