शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार बोलताना दिसले नाहीत – प्राजक्त तनपुरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखर वाटावी की नाही, का ती हत्तीवरून वाटावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न असून, सर्वसामान्यांच्या व शेतकऱयांच्या प्रश्नांवर संसदेमध्ये खासदार बोलताना दिसले नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर केली. ते आज पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, नगर जिल्हा सहकारी बँकेची नोकरभरती राज्य सरकार अथवा योग्य त्या एजन्सीमार्फत करावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.

खासदार सुजय विखे यांनी साखरवाटप सुरू केली, असे विचारल्यानंतर आमदार तनपुरे यांनी कुणी काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आह़े त्यामुळे आपण त्यावर बोलणं उचित नाही; पण हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर वाढवण्यासाठी अथवा कांद्याच्या विषयावर संसदेमध्ये बोलताना आपण कधी त्यांना पाहिले नाही व ऐकलेही नाही, अशी टीका तनपुरे यांनी सुजय विखेंच्यावर केली.

नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये संगणक प्रणालीच्या अद्ययावतीसाठी कमी प्रमाणामध्ये पैसा लागत असताना, शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याकरता एक नवीन एजन्सीसुद्धा नेमली गेली. वास्तविक हा खर्च 25 ते 30 कोटी रुपयांत झाला असता, मग एवढा खर्च कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगर जिल्हा बँकेने सध्या नोकर भरती काढलेली आहे, ती लवकर भरती करताना, त्यांनी राज्य सरकारमार्फत भरती करावी, अथवा नामांकित संस्थेमार्फत नोकरभरती करण्यात यावी. नाही तर हे सत्ताधारी वशिल्याचे लोक भरतील आणि याचे वाटोळे होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.