
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज पुन्हा एकदा आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘काॅक्रोच जनता पार्टी’ या उपरोधिक मोहिमेला पाठिंबा देत प्रकाश राज यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाची उपहासात्मक मोहीम मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. NEET पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढता असंतोष या मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य करणारे मीम्स आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या मोहिमेला पाठिंबा देताना प्रकाश राज यांनी सलग अनेक ट्विट्स केले.
MATCH ON .. Cockroachs janatha party takes Vs Bigots janatha party 😂😂😂 #justasking pic.twitter.com/WoDZPT53vd
— Prakash Raj (@prakashraaj) May 21, 2026
एका ट्विटमध्ये त्यांनी, “तरुणांच्या शक्तीला कमी लेखू नका,” असे म्हटले. तर दुसऱ्या पोस्टमध्ये “‘काॅक्रोच जनता पार्टी’ विरुद्ध धर्मांध जनता पार्टी” असे लिहित त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. असे वृत्त आज तक ने दिले आहे. प्रकाश राज यांनी याआधीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर उघडपणे टीका केली आहे. मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या टॉफीच्या भेटीवर त्यांनी “इमेज पॉलिटिक्स” असे म्हटले होते. तसेच एका नॉर्वेजियन पत्रकाराने मोदींना प्रश्न विचारूनही उत्तर न मिळाल्याने व्यासपीठ सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा पत्रकाराचा अधिकार आहे आणि उत्तर देणे ही नेत्याची जबाबदारी,” असेही ते म्हणाले होते.
प्रकाश राज हे अनेक वर्षांपासून सरकारविरोधी आणि सामाजिक विषयांवरील स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जातात. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींवर मौन बाळगल्याचा आरोप केला होता. “मी हिंदुत्वविरोधी नाही, मी मोदीविरोधी आहे,” हे त्यांचे विधानही मोठ्या वादाचे कारण ठरले होते.
2018 मध्ये कर्नाटकातील एका कार्यक्रमानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांनी वापरलेला मंच गोमूत्राने स्वच्छ केल्याचा दावा समोर आला होता. त्या घटनेची माहितीही प्रकाश राज यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती. सध्या ‘काॅक्रोच जनता पार्टी’ संदर्भातील त्यांच्या ट्विट्समुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे. काही जण त्यांना स्पष्टवक्ते कलाकार म्हणत आहेत, तर काही जण त्यांच्यावर राजकीय अजेंडा राबवल्याचा आरोप करत आहेत. मात्र, राजकारण आणि सत्तेबाबत उघडपणे मत मांडणाऱ्या कलाकारांमध्ये प्रकाश राज यांचे नाव कायम चर्चेत राहिले आहे.



























































