ठसा – सुनील शेंडे

अभिनेते सुनील शेंडे यांची ओळख रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज अशी होती. भूमिका मग ती कोणतीही असो, ती त्यांनी दमदारपणे सादर केली. आपल्या सशक्त अभिनयातून त्यांनी रंगभूमी, चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज या माध्यमातून तीन-चार दशके योगदान दिले. अलीकडे ते या सर्वांपासून दूर होते. वयाची 75 वर्षे गाठेपर्यंतचा त्यांचा प्रवास सशक्त आणि समृद्ध होता. त्यांच्या निधनाने या सर्वच क्षेत्राची हानी झाली आहे. राजकारणी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील तसेच नायक, नायकांचे वडील अशा विविध भूमिका त्यांनी कसदारपणे सादर केल्या. या गुणविशेषाच्या जोडीला लाभलेला खडा आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे ते माय-बाप रसिक प्रेक्षकांच्या मनात पोहचले. आपल्या भूमिकेच्या गुणविशेषाच्या बळावर त्यांनी त्यांच्या मनात घर केले. भूमिका छोटी असो की मोठी, याचा त्यांनी फार विचार केला नाही. विविध माध्यमांतील भूमिकांमागचा माणूस- माणूस म्हणून चांगला होता. तीच त्यांची प्रतिमा मरणोपरांत रसिकांच्या मनात कायम राहील. मेन विदाऊट रॉडोज, थरार, सविता दामोदर परांजपे, डॉक्टर तुम्हीसुद्धा, श्री तशी सौ, अशा विविध नाटकांतून शेंडे यांनी रंगभूमी गाजवली. चार दशकांपूर्वी त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, वीर सावरकर, डोक्याला ताप, घायाळ, जमलं हो यांसारख्या मराठी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. खलनायकी ढंगाच्या नायकांच्या अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. सरफरोश, गांधी, वास्तव, ईश्वर, नरसिंहा, दौड, खलनायक, जमीन असे काही गाजलेले हिंदी चित्रपट सांगता येतील. साठे महाविद्यालयाच्या बॉटनीच्या लेक्चरपासून ते नाटकाच्या माध्यमापर्यंत प्रवेश करणाऱ्या शेंडे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1973 साठी दूरर्शन वाहिनीवरील एक शून्य, शून्य या गुन्हेगारीवर आधारित थरार मालिकेने केली होती. त्यांच्या भूमिकेतील थरार मालिका आजही अनेकांना आठवते. दूरदर्शनवरील ‘सर्कस’ मालिकेत त्यांनी शहारुख खानच्या वडिलाची भूमिका केली होती. मोठय़ा पडद्याप्रमाणे त्यांनी छोटा पडदाही गाजवला.

सर्कस, चेहरा, शांती, पहला प्यार, कुछ तो लोग कहेंगे, मुंगेरी के भाई नवरंगी लाल, चिरंजीव, फुलवंती या हिंदी- मराठी मालिकांतून ते घराघरांत पोहचले. लोकप्रिय अभिनेते अभिषेक बच्चन, अमिर खान, शहारुख खान या मोठय़ा कलावंतांसोबतही त्यांना कसदार भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. ‘द लास्ट व्हिक्टरी इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातील एका भूमिकेत ते झळकले. 2013 साली ‘रिस्पेक्ट’ या वेबसीरिजमध्ये केलेली भूमिका शेवटची ठरली.

सुनील शेंडे हे बहुआयामी प्रतिभावंत होते. माध्यम कोणतेही असले तरी, वाटय़ाला आलेली भूमिका लहान-मोठी ही कारणे त्यांनी बघितली नाहीत. मिळालेल्या भूमिकेवर त्यांनी मनापासून प्रेम केले. मिळालेल्या भूमिकेस नेमके काय म्हणायचे, त्याचा अंदाज ते घेत असत. भूमिकेचा अभ्यास झाला की ते त्या भूमिकेशी एकरूप होत असत. म्हणूनच त्यांनी साकारलेल्या भूमिकेस रसिक-प्रेक्षकांनी पसंती दिली. म्हणूनच ते रसिकांच्या कायम स्मरणात राहील. या गुणविशेषांमुळेच त्यांना माध्यमात स्थान मिळाले. रुपेरी पडदा ते छोटा पडदा असो, त्यांनी गाजवला. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी, नाटक, चित्रपट या क्षेत्राची हानी झाली आहे.

>> प्रशांत गौतम