
साने गुरुजींनी सांगितलेला ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असा संदेश प्रत्यक्षात जगणारी, धडपडणारी अनेक मुले होऊन गेली आणि आपल्या कर्तृत्वाने सर्वदूर पोहचली. यातीलच अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नाव म्हणजे मुकुंद तेलीचरी. ते साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मध्यवर्ती कथामाला, मुंबईचे माजी कार्यवाह, साने गुरुजी संस्कार साधना संस्थेचे कोषाध्यक्ष होते. पाच वर्षांपूर्वी पुनरुज्जीवित झालेल्या अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह होते. दीर्घ आजाराने पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बालसाहित्यांच्या लेखन व चळवळींची मोठी हानी झाली आहे.
राज्यातील अनेक शाळांत साने गुरुजी कथामालेत मुकुंदरावांचे विविध संस्कार प्रधान कथांचे सादरीकरण झाले. विनोदी कथा कथनाचे कार्यक्रम खूपच रंगतदार होत असत. मुकुंदराव हे सुप्रसिद्ध विनोदी कथानिवेदक, गायक, साने गुरुजींचे निस्सीम भक्त, गप्पिष्ट स्वभावाचे दिलखुलास मित्र व लेखक होते. तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी कार्याध्यक्ष, पुणे कथामाला प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य, साने गुरुजी कथामालेचे खंदे कार्यकर्ते, उत्कृष्ट कथानिवेदक, गोड गळय़ाचे कवी, लेखक आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व अशी बहुरंगी त्यांची ओळख होती. साने गुरुजींच्या संस्कार प्रधान गोष्टी मुलांना सांगून त्यांचे मनोरंजन व प्रबोधन ते प्रदीर्घ काळापासून करीत असत. त्यांचे हे अपुरे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी नव्या पिढीने त्यांचे कार्य अनुसरले पाहिजे.
प्रकाशभाई मोहाडीकर यांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. प्रकाशभाई यांच्या या संकल्पनेला अनेकांनी मूर्त स्वरूप आणले. त्यामध्ये पुण्याच्या मुकुंद तेलीचरी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कथा सांगण्याचे उत्कृष्ट काwशल्य आणि गाणी गाण्यासाठी लागणारा गोड गळा त्यांना लाभला होता. मुलांकडून ते मजेशीर गाणी म्हणवून घेत. हजारो विद्यार्थ्यांना एका जागेवर खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. गणितातल्या गमतीजमती, कोडी ते गाण्यांमधून मुलांना शिकवीत. शिक्षकांसाठी कथाकथनाचे तंत्र आणि मंत्राचेही ते धडे देत. साने गुरुजी कथामालेचे ते कार्याध्यक्ष असताना त्यांनी अनेक विधायक उपक्रम हाती घेतले होते. तसेच पुणे कथामाला प्रबोधिनी स्थापन करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. प्रबोधिनीचे नाव केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दूरवर पोहचविले. साने गुरुजी कथामालेचे बुजुर्ग जयवंत मठकर यांचे ते अनुयायी होते. डॉ. दिलीप गरुड हे त्यांचे परममित्र. तेलीचरी आणि गरुड यांनी जयवंत मठकर यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले. मुकुंद तेलीचरी हे खऱ्या अर्थाने साने गुरुजींचे अपुरे कार्य पूर्ण करू शकतात, हा मठकर यांना पूर्ण विश्वास होता. तेलीचरी हे स्वतःहून महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम करीत असत. पुढील काळात जयवंत मठकर यांनी तेलीचरी यांचे कथाकथनाचे कार्यक्रम मोहन मोहाडीकर व वरळी साने गुरुजी कथामालेनेही त्यांचे कार्यक्रम मुंबईतील साने गुरुजी विद्यालयात घेतले. सतीश चिंदरकर यांचे खारचे अनुयोग विद्यालय, दादरचे महात्मा फुले विद्यालय, वरळीचे बाल विकास मंदिर येथे आयोजित करून विद्यार्थी व शिक्षकांना त्याचा लाभ मिळवून दिला. या कार्यक्रमासाठी त्यांनी शाळांकड़ून कोणतेही शुल्क घेतले नाही. मोहन मोहाडीकर यांनी मात्र मुकुंदरावांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था केली होती. छान उत्तमोत्तम कविता सादरीकरणात आणि गोष्टी रंगवून सांगण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. मुलांना मजेशीर प्रबोधनपर गोष्टी सांगणे व आपल्या गोड गळय़ामधून छान छान गाणी म्हणवून घेणे हा त्यांचा छंद होता. त्यांनी मुलांसाठी अनेक गोष्टी लिहिल्या व त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध केली. कथाकथन तंत्र आणि मंत्र हे शिक्षकांसाठी लिहिलेले पुस्तक फारच लोकप्रिय झाले. त्यांच्या बरोबरीने डॉ. दिलीप गरुड यांनीही मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिली. तेलीचरी आणि गरुड यांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. कथामालेसाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तेलीचरी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. असे तेलीचरी पुन्हा होणे नाही. तेलीचरींनी विविध शाळांमधून तसेच वरळी साने गुरुजी कथामालेत आणि मुंबईतील शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजले. खरोखरच ती पिढी भाग्यवान समजली पाहिजे. आमच्या पिढीने साने गुरुजींना पाहिले नाही, मात्र त्यांची उमेदीची जडण-घडण साने गुरुजींच्या संस्कारात घडली. आमच्या पिढीसाठी मुकुंद तेलीचरी हेच साने गुरुजी होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही.
>> प्रशांत गौतम




























































