प्रशांत किशोर ‘जदयू’च्या प्रचारातून बाहेर पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-kishore

सामना ऑनलाईन । पाटणा

हमखास विजय मिळवून देणाऱया निवडणूक व्यवस्थापन कौशल्यासाठी ‘माहिर’ असलेले संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या प्रचारातून अंग काढून घेतले आहे. आपला हा निर्णय त्यांनी ट्विटरवरून आज जाहीर केला आहे.

बिहारमध्ये ‘एनडीए’ ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे लढत आहे. संयुक्त जनता दलाच्या प्रचाराची धुरा पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आरसीपी सिंह यांच्या मजबुत खांद्यावर सोपवण्यात आली आहे, असे नमूद करत प्रशांत किशोर हे पक्षाच्या प्रचारातून अलग झाले आहेत. आपला राजकीय जीवनातील सध्याचा काळ हा प्रारंभिक अध्याय आहे. त्यामुळे माझी भूमिका शिकण्याची आणि सहकार्याची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र प्रशांत किशोर यांचा हा निर्णय नाराजीतून आल्याचे मानले जात आहे. अचानक पक्षात आलेल्या प्रशांत किशोर यांना थेट ‘उपाध्यक्ष’ हे दुसऱया क्रमांकाचे पद देण्यात आले. त्यावरून संयुक्त जनता दलातील ज्येष्ठ नेते नाराज आहेत. तर प्रशांत किशोर यांना महत्त्वाचे पद देण्यात आले असले तरी त्यांच्याकडे ‘युवा आघाडी’ शिवाय अन्य कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर हे नाराज आणि अस्वस्थ असल्याचे वृत्त आहे.