
सामना ऑनलाईन । कोलकाता
भाजपच्या चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय रणनितीकार व सल्लागार प्रशांत किशोर यांनी हातमिळवणी केली आहे. गुरुवारी प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करणार आहेत. याआधी त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसाठी काम केले. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वायएसआरला जबदरदस्त यश मिळण्यामागे प्रशांत किशोर यांचेच डावपेच होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये न भुतो यश मिळवत 18 जागा जिंकल्या. राज्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहता ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. अशातच 2021 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार प्रतिकार करण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून व्यूहरचना केली जात आहे. याचाच भाग म्हणून प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. कोलकातामध्ये प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत काम करण्यास होणार दिल्याचे वृत्त आहे. एक महिन्यानंतर ते ममतादीदींसाठी काम करण्यास सुरुवात करतील.
Sources: Political Strategist Prashant Kishor to officially start working with West Bengal Chief Minister Mamata Banerjee after one month https://t.co/gcV1EjK3z1
— ANI (@ANI) June 6, 2019
कोण आहेत प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर हे मुळचे बिहारचे आहेत. नुकत्याच आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. या निवडणुकीत वायएसआरने 175 पैकी 150 जागांवर विजय मिळवला होता. याआधी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2015 मध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून देण्यात किशोर यांचा मोठा वाटा होता.



























































