गँगस्टरने फी चे पैसे दिले नाही, वकिलाने खटला लढविणे थांबवले

1993 बॉम्बस्फोटातील मुख्य दोषींपैकी एक असलेल्या अबू सालेम याने त्याच्या वकिलांचे पैसेच दिले नाहीये. खटला लढवण्यासाठी आवश्यक असलेली फी त्याने दिली नसल्याने त्याच्यासाठी यापुढे खटले चालवणार नसल्याचे वकील प्रशांत पांडे यांनी सांगितले आहे. पांडे यांनी सालेमसाठी गेली 3 वर्ष विविध खटल्यांमध्ये न्यायालयात बाजू मांडण्याचे काम केले होते. पांडे यांनी आपली फी मिळावी यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे तक्रारही करण्याचे ठरविले आहे.

पांडे यांनी सालेमला एक पत्र लिहिलं होतं. 7 सप्टेंबरच्या या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की “अनेकदा आठवण करून दिल्यानंतरही तू मी तुझ्यासाठी लढवलेल्या खटल्यांसाठीची फी दिलेली नाही आणि इतर गोष्टींसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा परतावाही केलेला नाहीस. ही रक्कम न दिल्याने यापुढे मी तुझे खटले लढणार नाही आणि भविष्यात कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी सल्ला देण्याचेही काम करणार नाही “. पांडे यांनी सालेम यांची दोन महत्वाच्या कायदेशीर प्रकरणात मदत केली होती. संजू चित्रपटामध्ये अबू सालेमचेही पात्र दाखवण्यात आले असून ते पात्र आक्षेपार्ह आणि प्रतिमाहनन करणारे असल्याचं म्हणत चित्रपट निर्मात्यांना पांडे यांनी जुलै 2018 मध्ये नोटीस पाठवली होती. अबू सालेमतर्फे पोर्तुगाल सरकारविरोधात मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन आणि प्रत्यार्पण आदेशाचे उल्लंघन केल्याचे म्हणत नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्येही पांडे यांनी सालेमला कायदेशीर मदत केली होती. पांडे यांनी सालेमला त्याच्या खटल्याशी निगडीत सर्व कागदपत्रे कार्यालयातून घेऊन जाण्यास सांगितले आहे. मिड डे या वर्तमानपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या