राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांचा दौरा आटोपून दिल्लीस रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्याच्या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सपत्निक जुने गोवें येथील जगप्रसिध्द बॉम जिझस बासिलिका चर्च तसेच मंगेशी येथील मंदिराला भेट दिली. राज्यपाल मृदुला सिन्हा, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी जुने गोवे चर्चला भेट देऊन सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. २० मिनिटांच्या भेटीत राष्ट्रपतींनी चर्चची माहिती जाणून घेतली. बासिलिका चर्चचे रेक्टर फादर पेट्रीसियो फर्नांडिस यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली. आपण याआधीही या चर्चला भेट दिल्याचे आणि येथे येऊन आपल्याला धन्य वाटले, असे कोविंद यांनी यावेळी बोलून दाखवले.

राष्ट्रपती नंतर मंगेशीला गेले. तेथे देव मंगेशाचे दर्शन घेतल्यानंतर ते पणजीकडे रवाना झाले. कोविंद हे काल सकाळी सपत्निक गोव्यात आले होते. काल दुपारी ते गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले तर सायंकाळी त्यांचा राज्य सरकारतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. काल रात्री ते दोनापावल येथील राजभवनवर मुक्कामाला होते. आज सकाळी कोविंद दांपत्याने राजभवन परिसरात वृक्षारोपण केले. या प्रसंगी राज्यपाल मृदुला सिन्हा उपस्थित होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तींनी सकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली. न्यायमूर्ती एन. एम. जमादार, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग, न्यायमूर्ती नूतन सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी नागरी सत्काराला उत्तर देणाऱ्या भाषणाची सुरुवात आणि शेवट कोंकणी बोलून केला, शिवाय गोव्याच्या लोकांना राष्ट्रपती भवन पाहण्याचे निमंत्रण देखील दिले.