राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कोरोना चाचणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायिका कनिका कपूरमुळे कोरोना राष्ट्रपती भवनात देखील पोहोचला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील आता कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही काही दिवसांपूर्वी खासदार दुष्यंत सिंह यांना भेटली होती व त्यानंतर दुष्यंत सिंह यांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.

गायिका कनिका कपूर 9 मार्चला लंडनहून मायदेशी दिल्लीत परतली. वास्तविक कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह होती. पण ती विमानतळावरून निसटली आणि लखनौला रवाना झाली. लखनौतील गॅलेट अपार्टमेंटमध्ये तीचा मुक्काम होता. तेथे जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत भाजपचे खासदार दुष्यंत सिंह, काँग्रेस नेते जितीन प्रसाद, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तरप्रदेशातील नेते, अनेक बडे अधिकारी होते. कनिका कपूर लखनौत ताज हॉटेलमध्येही गेली होती. 16 आणि 14 मार्चला ती कानपूरलाही गेली होती. त्यानंतर दुष्यंत सिंह हे राष्ट्रपती भवनात गेले होते.

खासदार दुष्यंत सिंह लोकसभेत हजर होते. त्यांच्या बाजूला खासदार निशिकांत दुबे बसले होते. तसेच दुष्यंत सिंह, स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थितीत होते. या बैठकीत तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन त्यांच्या बाजूला बसले होते. त्यामुळे खासदार हादरले आहेत. कोरोना संसदेत पोहचल्याची भिती व्यक्त होत आहे. संसद अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी डेरेक ओ ब्रायन यांनी केली आहे.

अनेक नेते क्वारंटाईनमध्ये

कनिका कपूरला कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली. वसुंधरा राजे, खासदार दुष्यंत सिंह, जतीन प्रसाद आदी नेते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान, कनिकाच्या पार्टीत सहभागी झालेल्या लोकांची माहिती घेण्यात येत आहे. तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरू आहे.