
मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असल्याची बतावणी करून दहा लाखांचे 24 तोळे सोने लुटल्याप्रकरणी दोन लष्करी जवानांसह तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिन शंकर चव्हाण (30), राहुल शंकर चव्हाण ( 26) हे लष्करी जवान सख्खे भाऊ व त्यांचा साथीदार अतुल ऊर्फ शिवाजी नामदेव सूर्यवंशी (रा. फडतरवाडी, ता. अथणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांकडून चोरीचे सोने जप्त केले आहे.
पंजाबमधील अमृतसर येथे गलई काम करणारे ज्योतिराम पाटील (35, रा. कनवाड, ता. शिरोळ) हे निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेसने सोने घेऊन मिरजेत आले. शनिवारी दुपारी ते मिरज स्थानकात आल्यानंतर रेल्वेतून उतरून प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर तेथे थांबलेल्या दोघांनी त्यांना अडविले. ‘आम्ही पोलीस आहोत, तुम्ही विनापरवाना सोने आणले आहे’, असे म्हणत त्यांच्याकडील 24 तोळे सोन्याचे कडे घेऊन दोघे निघून गेले. याबाबत रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयितांचा शोध सुरू केला.
महादेव पाटील हे अमृतसर येथे मामा संजय पाटील यांच्या दुकानात सोने गाळपचे काम करतात. मामाचे सोने घेऊन ते गावाकडे येत होते. सोने घेऊन येताना पुणे पोलिसांकडून तपासणी होण्याच्या भीतीने ज्योतीराम यांनी रेल्वेतील सहप्रवासी जवान सचिन चव्हाण यांच्याकडे सोन्याचे कडे ठेवण्यास दिले. सातारा स्थानकात ज्योतिराम पाटील यांनी चव्हाण यांच्याकडून सोने परत घेतले. ज्योतिराम पोलिसांना घाबरत असल्याचे पाहून सचिन चव्हाण याने त्याचा सुट्टीवर आलेला लहान भाऊ राहुल यास ज्योतिराम याच्याकडून सोने काढून घेण्यासाठी मिरज स्थानकात येण्यास सांगितले. राहुल चव्हाण हा अतुल सूर्यवंशी या नातेवाईकास घेऊन मिरजमध्ये आला. राहुल व अतुल यांनी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना ज्योतिराम यास अडवून पोलीस असल्याची बतावणी करून सोने घेऊन पोबारा केला.
ज्योतिराम यांच्याकडे सोने असल्याचे लष्करी जवान सचिन चव्हाण याला माहिती असल्याचे समजताच पोलिसांनी रेल्वेकडून त्याची माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले. सचिन चव्हाण याने भाऊ राहुल व नातेवाईक अतुल सूर्यवंशी याच्या मदतीने सोने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी राहुल आणि अतुल यांना अटक केली. सचिन चव्हाण हा हिमाचल प्रदेशात व राहुल चव्हाण पंजाबमध्ये लष्करात शिपाई आहेत. रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे व रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सतबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चार दिवसांत चोरीचा छडा लावला.




























































