
कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकासिस म्हणजे काळय़ा बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले. यावरील औषधांचा तुटवडा आणि रुग्णांची ढासळणारी प्रकृती यामुळे या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले. यावर आता नियंत्रण येत असले तरी आजार होऊच नये म्हणून काय करावे लागेल? त्याचप्रमाणे यामध्ये मौखिक आरोग्य म्हणजेच तोंडाची, दातांची स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबाबत शासकीय दंत महाविद्यालयातील विभागप्रमुख दंतपरिवेष्टनशास्त्र ज्येष्ठ डॉ. राजेश गायकवाड यांच्याशी केलेली बातचीत.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
– हिंदुस्थानमध्ये कोरोना विषाणूच्या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव म्युकरमायकोसिस हा साथीचा रोग म्हणून महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये घोषित करण्यात आला आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार असून याचे तत्काळ निवारण करून उपचार सुरू करणे अनिवार्य आहे. या आजाराचा संसर्ग नाक, कान, घसा, जबडा आणि दात यापासून सुरू होऊन डोळे आणि मेंदूपर्यंत पोहचून दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. याच कारणास्तव आज आपण या आजाराची लक्षणे तसेच यावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती करून घेऊया.
या रोगाची लक्षणे कोणती?
– या रोगाची सुरुवात नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसण्यापासून होते आणि काही काळातच हा रोग रौद्र रूप धारण करतो. या रोगात प्रामुख्याने चेहऱयाचे स्नायू दुखणे, अर्धशिशी, नाक चोंदणे, नाकाला सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्राव होणे, चेहरा व डोळ्यांना सूज येणे, दात दुखणे व हलू लागणे यांसारखी अनेक लक्षणे दिसतात. परंतु प्राथमिक स्थितीमध्येच या रोगाची लक्षणे ओळखून तातडीने आपल्याजवळील रुग्णालयात जाऊन उपचार चालू केल्यास हा रोग कायमची हानी होण्याआधी रोखला जाऊ शकतो.
हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
– सगळ्यात प्रथम मधुमेही व्यक्तींनी शरीरातील वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणावे, जेणेकरून या रोगाचा शरीरात इतरत्र होणारा फैलाव आटोक्यात येईल. याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्सचे प्रमाण कमी व अधिक करू नये. तसेच डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टेरॉइड्स घेऊ नये. हा रोग दमट वातावरणात जास्त वेगाने पसरतो. त्यामुळे मास्क व टूथब्रश वारंवार बदलत राहावे.
हा आजार झाल्यास कोणते उपचार करावेत?
– या रोगाची लक्षणे आढळून आल्यास सर्वात प्रथम त्या रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या, आजार असलेल्या भागाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. या रोगामुळे नाकात निर्माण होणाऱया द्रावाची किंवा राखाडी रंगाच्या पापुद्रय़ाची शक्य असल्यास सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्या केल्या जातात आणि निदान पक्के केले जाते. रुग्णाला तत्काळ अॅम्फोटेरीसिन-बी हे इंजेक्शन दिले जाते.
स्कॅनवरील निदानाप्रमाणे या आजाराने व्याप्त असलेल्या नाकाच्या हाडांची, सायनसेसची आणि डोळ्याची शस्त्रक्रिया करून अंतर्गत भागात निर्माण झालेली बुरशी साफ केली जाते. आजार जास्त पसरलेला असल्यास आणि हाडांमध्ये गेला असल्यास ती हाडं शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जातात. या रुग्णावर नाक-कान-घशाच्या, डोळ्याच्या आणि दंतशल्यशास्त्र शाखेच्या विशेषज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया आणि उपचार करते.



























































