
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे आज लोकार्पण केले. रामानुजाचार्यांची स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी या अष्टधातूपासून तयार करण्यात आलेली मूर्ती जगातील दुसरी उंच मूर्ती असून या मूर्तीची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे. रामानुजाचार्यांनी समाजातील जातीभेद संपवला, त्यांनी दलितांना उपासनेचा अधिकार देऊन समानतेचा संदेश दिला आहे, असे मोदी म्हणाले.
रामानुजाचार्य यांची स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी ही मूर्ती 1 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. या मूर्तीच्या लोकार्पणापूर्वी पंतप्रधान तेथील धार्मिक कार्यक्रमात सामील झाले. पुजाऱयांनी त्यांना रुद्राभिषेकात सामील करून घेतले. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर मोदींनी संबोधित करताना म्हटले की, 11व्या शतकातील संत रामानुजाचार्य हे समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील जातीभेद संपवण्याचे काम केले. त्यांनी अस्पृश्यता संपवण्यासाठी प्रयत्न केले. याच्याच आधारे आज आपला देश भविष्याची पायाभूत आखणी करत आहे. रामानुजाचार्यांनी यादव गिरी येथे नारायण मंदीर बांधले. तेथे त्यांनी दलितांना पूजेचा अधिकार दिला. गुरूच्या माध्यमातून ज्ञान मिळते आणि 108 गुरूंकडून जितके ज्ञान मिळते तितके रामानुजाचार्यजींच्या दर्शनाने मिळाले, असे मोदी या वेळी म्हणाले.
पंतप्रधान स्वागताला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱयावर असून शिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाणे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टाळले आहे. आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी मंत्र्यांना स्वागतासाठी पाठवले होते.



























































