मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान? गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल! पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे वैभव असलेला हिरे व्यापारही गुजरातला पळवला गेला आहे. सुरतमध्ये हिरे व्यापाऱयांसाठी उभारण्यात आलेल्या डायमंड बोर्सचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यामुळे मुंबईतील लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे. यावर मौन धारण करणाऱया मिंधेंवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठत आहे. गंभीर बाब म्हणजे उद्घाटन सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचा उदोउदो करत सूरत पुढे गेले तर गुजरात पुढे जाईल आणि गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल, असे विधान केले. त्यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान, असा सवाल केला जात आहे.

आज रविवारी सुरत डायमंड बोर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. मोदी यांच्या गुजरातधार्जिण्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना सोशल मीडियातून घेरण्यास सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणात प्रत्येक मिनिटाला गुजरात आणि सुरत या शब्दांवरच जोर दिल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत सुरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत असून आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरत डायमंड बोर्स तयार करण्यात आले आहे. त्यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास मोठी संधी मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर होता. आता तो पाचव्या क्रमांकावर असून लवकरच तिसरे स्थान पटकावेल, असेही ते म्हणाले. सरकारने येणाऱया 25 वर्षांचे लक्ष्य ठरवले असून 5 ड्रिलियन डॉलर आणि 10 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी काम केले जात आहे, असे सांगतानाच सुरतच्या डायमंड इंडस्ट्रीची जबाबदारी वाढल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सोशल मीडियातून संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. मोदी हे अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल करण्यात येत आहे. हे देशाचे नाही गुजरातचे पंतप्रधान आहे.,आमच्या राज्यातही काही योजना राबवा मोदीजी, मोदींनी ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीच गटारात फेकून दिली आहे, अशा शब्दांत सोशल मीडियातून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सुरुवातीची तीन मिनिटे गुजरातीतून भाषण

सुरत डायमंड बोर्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर व्यापाराची संधी मिळेल. देशाची प्रगती होईल असे मोदी यांनी सांगितले, तर दुसरीकडे त्यांनी स्वतः सुरुवातीची तीन मिनिटे गुजराती भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. संपूर्ण भाषणात प्रत्येक मिनिटाला त्यांनी गुजरात आणि सुरत या दोन शब्दांवर सातत्याने भर दिला. मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण जगातील मीडिया कान आणि डोळे लावून बसला होता. मोदी यांनी मात्र आपल्या भाषणातून भविष्यात केवळ गुजरातच्याच विकासावर भर असेल हेच भाजप सरकारचे उद्दिष्ट असल्याचे दाखवून दिले.

इंग्रज आधी सुरतला आल्याचा दावा

इंग्रज सर्वात आधी सुरतमध्ये आल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. डायमंड, टेक्सटाईल्स, टुरीस्ट आणि एज्युकेशन या क्षेत्रात सुरत पुढे असून आयटी क्षेत्रातही हे शहर आघाडीवर असल्याचा दावा त्यांनी केला. सर्वात मोठे समुद्री जहाज सुरतमध्ये बनत होते, असेही ते म्हणाले. 84 देशांच्या बोटी सुरतच्या बंदरात येत होत्या. आता 125 देशांच्या बोटी येथील बंदरात येतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्र हिताचा विषय असतो तेव्हा बिळात लपता -रोहित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठय़ा डायमंड बोर्सचे उद्घाटन झाले. याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावे की, मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळय़ादेखत पळवला गेला याचे दुःख व्यक्त करावे हेच समजेनासे झालेय, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर तर महाराष्ट्र हिताचा विषय येतो तेव्हा बिळात लपून बसता, अशा शब्दांत मिंधे सरकारवर तोफ डागली आहे.

मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारला, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता. हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱयांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? असा सवाल करतानाच किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून केली आहे.

गुजरातच्या विकासासाठी मोदी गॅरंटी

गुजरातच्या विकासासाठी तुमच्या प्रत्येक प्रयत्नात सरकार तुमच्यासोबत आहे अशी मी गॅरेंटी देतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही सुरुवातीपासूनच डायमंड सेक्टरला एक्स्पोर्ट प्रमोशनसाठी फोकस एरिया ठरवले. त्यासाठी अनेक प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या प्रयत्नांचा जास्तीत जास्त फायदा उठवायचा आहे. जगभर हिंदुस्थानचीच चर्चा आहे, असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेन, मेट्रो, विमानतळ… सुरतला सर्वकाही

आपल्या भाषणात मोदी यांनी केवळ सुरत आणि गुजरातचेच गुणगाण केले. सरकार सुरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगतानाच सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मेट्रो रेल्वे सेवा, पोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी बंद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सुरतला बुलेट ट्रेन प्रकल्पाशी जोडले आहे. उत्तर-पूर्व हिंदुस्थानपर्यंत सुरतची रेल कनेक्टिव्हीटी असेल. अशी आधुनिक कनेक्टिव्हिटी असणारे सुरत हे देशाचे एकमेव शहर असल्याचा दावाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.

सुरत डायमंड बार्सची वैशिष्टय़े

z 67 लाख चौरस फुटांहून अधिक विस्तीर्ण जागेत प्रशस्त कार्यालये z दीड लाख रोजागार निर्माण होणार z साडेतीन हजार कोटींचा खर्च z इमारतीत साडेचार हजार व्यापाऱयांची आलिशान कार्यालये z 15 मजल्यांचे 9 टॉवर, 300 चौरस फुटांपासून ते एक लाख चौरस फुटांपर्यंत कार्यालये

मुंबईतील लाखो लोकांचा रोजगार गेला – पवार

जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे देशाच्या हिताबद्दल विचार करण्याची क्षमताच नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. हिरे व्यवसाय आधी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात होता, परंतु तो गुजरातला पळवला. त्यामुळे मुंबईतील लाखो लोकांचा रोजगार गेला, स्थानिकांच्या नोकऱया गेल्या, असा आरोप त्यांनी केला.

गुजरात लघुभारत

गुजरात हे लघुभारत बनले आहे, असे विधानही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले. गुजरात हे ग्लोबल सिटी म्हणून उदयाला येत असून ‘सुरत बढेगा तो गुजरात बढेगा’ आणि ‘गुजरात बढेगा तो भारत आगे बढेगा’ असे वक्तव्य त्यांनी केले. इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी असो किंवा डायमंड किंवा कुठलेही क्षेत्र असो सुरतचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिले.

2014 पासूनचा डाव

कोविडमुळे सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन लांबणीवर पडले, अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान दिली. त्याचबरोबर 2014 मध्ये दिल्ली वर्ल्ड डायमंड कॉन्फरन्समध्येच सुरत डायमंड बोर्ससाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरल्याचेही पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे 2014 मध्येच मुंबईतील डायमंड बोर्स उद्योग गुजरातला पळवण्याचा डाव मोदी सरकारने आखला होता हे समोर आले आहे.