
कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्याचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत देशमुख यांनी मास्कनिर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ मास्कनिर्मितीला सुरुवात केली. हे मास्क बनवून कैदी स्वतः आणि तुरुंग प्रशासनातही वापरण्यात येत आहेत. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. कैद्यांनाही त्यांचा मोबदला जमा केला जातो.



























































