म्हाडा व झोपू योजनेतील घरं स्वस्तात देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा, टोळीचा म्होरक्या गजाआड

म्हाडा व झोपू योजनेतील काही सदनिका विकायच्या आहेत. दोन्ही विभागांचे अधिकारी आपले एकदम खास आहेत. त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये तुम्ही स्वतःचे घर घेऊ शकता. अशाप्रकारची चालबाजी करून पद्धतशीर जाहिरातबाजी हा तोतया अधिकारी बनावट कागदपत्र दाखवून करत होता. अशा पद्धतीने तो अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घालून पसार झाला होता. अखेर नेहरू नगर पोलिसांच्या हाती हा भामटा लागला. पोलिसांनी त्याच्या साथीदाराला देखील बेड्या ठोकल्या.

प्रितम ओसवाल असे या भामट्याचे नाव आहे. ओसवाल तसेच त्याच्या टोळीतल्या संतोष दळवी, सिंग व इम्रान या चौघांनी गतवर्षी एका तरुणाला म्हाडामधून स्वस्तात सदनिका मिळवून देतो, असे खोटे सांगून तसेच विश्वास बसावा याकरिता घराचे बोगस कागदपत्र दाखवून सात लाख 56 हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून या चौघांविरोधात कुर्ल्याच्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारचे अन्य दोन गुन्हे देखील दाखल झाले होते. पैसे घेतल्यापासून चौघेही आरोपी पसार झाले होते. मोबाईल व ठावठिकाणा बदलून ते राहत असल्याने त्यांना शोधणे अवघड झाले होते. अखेर वरिष्ठ निरीक्षक युसूफ सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शाहिन देसाई तसेच गणेश उगले, सुर्यवंशी, कसबे, तुषार आणि वानखेडे यांच्या पथकाने शोध घ्यायला सुरुवात केली. तपासा दरम्यान कमी किंमतीत घर देण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसविणार्‍या टोळीचा म्होरक्या प्रितम ओसवाल हा कर्जतमध्ये सापडला. तो हाती लागल्यानंतर सिंग याला बेड्या ठोकण्यात आले. चौकशीत या आरोपींनी नेहरूनगर, एमआयडीसी, बोरीवली आदी ठिकाणी 15 हून अधिक लोकांची घराच्या नावाने फसवणूक केल्याची कबूली दिली आहे. त्यांचे अन्य दोन साथीदार दळवी व इम्रान यांचा शोध सुरू असून ते ही लवकरच हाती लागतील असे पोलिसांनी सांगितले.

अशी करतात बनवाबनवी

सिंग हा इस्टेट दलालाचे काम करतो. त्याचे म्हाडातील काही अधिकारी ओळखीचे असल्याने त्यांच्या माध्यमातून कुठे म्हाडा तसेच झोपू योजनेतील सदनिका आहेत त्याची माहिती तो घेत होता. त्यानंतर सदनिकांचे फोटो काढून ते ओसवालला द्यायचा. ओसवाल 90 एकर्स डॉट कॉम तसेच प्रसारमाध्यमांद्वारे सदरच्या सदनिका कमी किंमतीत विकत मिळतील अशी जाहिराबाजी करायचा. जाहिरात पाहून कोणी घर घेण्यास इच्छा व्यक्त केल्यास दळवी व सिंग स्वतः अधिकारी म्हणून सामोरे जायचे व सदनिकेचे बोगस म्हाडाचे कागदपत्र संबंधितांना दाखवयाचे. मग ओसवाल मध्यस्ती असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे घ्यायचा. मग ते सर्व आपापसात पैसे वाटून घ्यायचे. यामध्ये ओसवालचा वाटा सर्वाधिक असायचा.