पृथ्वीचे शतक एका धावेने हुकले अन् विक्रमही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

फिरोजशहा कोटला मैदानावरील शनिवारच्या रोमांचक आयपीएल लढतीत कोलकात्याने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉने आक्रमक फटकेबाजी केली. 55 चेंडूंत पृथ्वीने 99 धावांची तुफानी खेळी केली. त्यांच्या या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र केवळ एका धावेने पृथ्वीचं शतक हुकलं. लॉकी फर्ग्युसनने पृथ्वीला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी बाद केलं. 99 धावांवर बाद झाल्यानंतर पृथ्वीने आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी गमावली. आयपीएलमध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्याची पृथ्वीची संधी केवळ एका धावेने हुकली. फिरोजशहा कोटला मैदानावर दोन्ही संघांमध्ये झालेला हा सामना निर्धारित षटकांमध्ये अनिर्णीत अवस्थेत सुटल्यामुळे, अखेरीस सुपरओव्हरमध्ये दिल्लीने सामन्यात बाजी मारली.

2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार्‍या मनीष पांडेने 19 वर्षे आणि 253 दिवस या वयात डेक्कन चार्जर्सविरुद्ध शतक झळकवलं होतं. 19 वर्षे 141 दिवस वय असलेल्या पृथ्वी शॉकडे शनिवारी झालेल्या सामन्यात हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र या संधीचं सोनं करण्याची संधी पृथ्वीला साधता आली नाही. शिवाय आयपीएलमध्ये केवळ एका धावेने शतक हुकणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज ठरला. याआधी सुरेश रैना आणि विराट कोहलीचं शतक एका धावेने हुकलं होतं. मात्र सुरेश रैना 99 धावांवर नाबाद राहिला होता.