पृथ्वी शॉचा डबल धडाका! 7 षटकार व 19 चौकारांची आतषबाजी

469

युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्या झंझावाती फलंदाजीत बुधवारी बडोद्याच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱया पृथ्वी शॉने अवघ्या 239 मिनिटांत तसेच 179 चेंडूंत 7 खणखणीत षटकार व 19 शानदार चौकारांसह 202 धावांची संस्मरणीय खेळी साकारली आणि मुंबईला निर्णायक विजयाची भक्कम पायाभरणी करून दिली. मुंबईने दुसऱया डावात 4 बाद 409 धावांवर डाव सोडला. त्यामुळे बडोद्यासमोर विजयासाठी 534 धावांचे आव्हान उभे ठाकले. बडोद्याने तिसऱया दिवसअखेरीस 3 बाद 74 धावा केल्या असून आता मुंबईला विजयासाठी 7 बळी टिपण्याची गरज आहे.

मुंबईकर पृथ्वी शॉचे पालनकर्ते शिवसेना विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस यांची पत्नी सुनयना पोतनीस यांना पृथ्वी आपली आईच मानायचा. तुमचे माझ्यावर मोठे ऋण आहेत. ते फेडण्यासाठी मी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेमध्ये 200 धावांचा पल्ला पार करीन, असे वचन त्याने दिवंगत सुनयना पोतनीस यांना दिले होते. ते त्याने बुधवारी खरे केले. पृथ्वी शॉने रणजी क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याविरुद्धच्या लढतीत चौकार-षटकारांची बरसात करीत 202 धावांची संस्मरणीय खेळी साकारली.

मुलानीची पुन्हा चमक

पहिल्या डावात चमक दाखवल्यानंतर शम्स मुलानीने दुसऱया डावातही आपला ठसा उमटवला. त्याने बडोद्याच्या विराज भोसले (41 धावा) व विष्णू सोलंकी (8 धावा) यांना बाद केले. तुषार देशपांडेने आदित्य वाघमोडेला 3 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पृथ्वी शॉने रणजी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरे वेगवान द्विशतक साजरे केले. त्याने 174 चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण केले. याआधी रवी शास्त्राr यांनी 123 चेंडूंत आणि राजेश बोराहने 156 चेंडूंत द्विशतक केले होते.

कर्णधार सूर्यकुमारचे दमदार शतक

पृथ्वी शॉने 7 षटकार व 19 चौकारांसह 202 धावांची अफलातून खेळी साकारल्यामुळे मुंबईला निर्णायक विजयाची आस बाळगता आली. भार्गव भट्टने त्याला बाद केले, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने मुंबईच्या धावसंख्येत भर घालताना दमदार शतक झळकावले. त्याने 5 षटकार व 12 चौकारांसह नाबाद 102 धावा फटकावल्या.

190 धावांची धडाकेबाज सलामी

शम्स मुलानीने बडोद्याचा अखेरचा फलंदाज बाद केल्यामुळे बडोद्याचा पहिला डाव 307 धावांमध्ये आटोपला. त्याने 6 फलंदाज बाद केले. त्यानंतर पृथ्वी शॉ व जय बिस्ता या जोडीने पहिल्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी रचताना बडोद्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दीपक हुडाने जय बिस्ताला 68 धावांवर बाद केले आणि जोडी फोडली. त्यानंतर शुभम रांजणे (2 धावा) व अजिंक्य रहाणे (9 धावा) यांना अपयश आले.

आपली प्रतिक्रिया द्या