खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (आर. टी. ई.) नुसार शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) 25 टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम 12 (1) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना नामांकीत खासगी विना अनुदानित शाळेत 25 टक्के आरक्षित कोटयातून मोफत प्रवेश मिळू शकतो. त्यानुसार, मुंबई जिल्ह्यातील एकूण 343 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 6 हजार 469 जागा उपलब्ध आहेत. पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून 16 फेब्रुवारीपासून पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in

(www नाही) या संकेतस्थळावरून किंवा  education.maharashtra.gov.in  या सरलच्या वेबसाईट मधील विद्यार्थी (Student) या टॅबमधील आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी केले आहे. दरम्यान, पालिकेने 53 मदत- मार्गदर्शन केंद्रांची सुविधा  उपलब्ध करून दिली आहे.