
>> नमिता दामले
प्रिया नाडकर्णी हिने मध्य प्रदेशातील मांडला जिह्यात आदिवासी मुलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी ‘मृदा’ ही संस्था सुरू केली आहे. प्रियाचा हा प्रवास जाणून घेऊया…
प्रिया तुमचे बालपण, शिक्षण याबद्दल काही सांगा.
मी पार्ले टिळकमध्ये शिकून सेंट झेवियर्समधून पदवी घेतल्यानंतर चेन्नईला जाऊन पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दोन वर्षे वृत्तपत्रात काम केल्यानंतर मी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबादमधून वित्त विषयामध्ये एम.बी.ए. केलं व त्यानंतर मी बंगलोरमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये 2010 ते 2012 पर्यंत मी बंगलोरमध्ये काम करीत होते.
मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर इथे बालपण, शिक्षण, नोकरी असं सगळं छान असताना तू मांडलामध्ये गेलीस?
तळागाळातील लोकांमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा मनात नेहमीच होती. तुम्ही जेव्हा लठ्ठ पगाराची नोकरी करता तेव्हा त्या उत्पन्नाची आणि राहणीमानाची तुम्हाला सवय होत जाते आणि तुम्ही लोकांपासून दूर जाता. दोन वर्षांत शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडल्यावर माझं ओझं हलकं झालं आणि मला जे करायचं होतं त्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण राहिलं नाही.
तुझ्या या निर्णयाबद्दल तुझ्या आई-वडिलांची आणि जोडीदाराची भूमिका काय होती?
आई-वडिलांचा सुरुवातीला स्वाभाविकच विरोध होता. पण जोडीदार मात्र समविचारी असल्यामुळे भक्कम साथ होती.
तुला हा निर्णय घेताना असुरक्षित वाटलं नाही का?
नोकरी सोडल्यानंतर महिला व तरुण मुलांसाठी काम करणाऱया प्रदान या संस्थेबरोबर महिला अत्याचार, युवा रोजगार, कृषीसुधार यामध्ये सल्लागार, मदतनीस म्हणून कार्यरत होते. त्याच वेळी ग्रामीण जीवनाशी जुळवून घेता येतंय का याबद्दल स्वतला आजमावत होते, स्वतशी नव्यानी ओळख करून घेत होते. त्यातून लक्षात आलं की मूलभूत गरजा अगदी कमी आहेत. त्या भागल्या तर आपण आनंदात जगू शकतो.
मुलांसाठी शाळा काढायचा विचार का आणि कधी केला?
महिला आणि युवकांसाठी काम करणाऱया काही संस्था आहेत, पण मुलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी काम करणारं कोणी नाहीये. त्यामुळे तरुण पिढी दिशाहीन होऊन काहीतरी मोलमजुरीचं काम करते किंवा व्यसनं वगैरे करते. त्यांना सल्ला देऊन मदत देऊ केली. तेव्हा मला हे जाणवलं की आपण ओल्या मातीवर काम करायला पाहिजे आणि त्यातून ‘मृदा’ने आकार घेतला.
तिथे दुसऱया शाळा आहेत का?
हो. सर्व शिक्षा अभियानामुळे शाळा आहेत. नोंदणीही भरपूर होते. इमारती आहेत, पण शिक्षक कमी आहेत. आठवीपर्यंत परीक्षा नसतात. तिथपर्यंत मुलं सरकारी शाळेत शिकतात. नववीत परीक्षेत त्यांना कळत की आपल्याला काहीच येत नाहीये. मग ती शाळा सोडून देतात. काही 10 वी – 12 वी शिकतात, पण त्यानंतर करण्यासारखं काहीच नसतं. त्यामुळे त्यांना निराशा येते. पण कोणी जर त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर त्यांच्याबद्दल या माणसांना विश्वास आहे, हे लक्षात आलं.
‘मृदा’ची शाळा कधी सुरू झाली, किती मुलांसाठी?
2016 मध्ये 90 मुलांसाठी शाळेची सुरुवात झाली. पण त्याच वेळी असं लक्षात आलं की शिक्षणावर परिणाम करणारे इतर घटक उदा. पोटभर अन्न, शाळेत येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ, सुविधा, रस्त्याचा अभाव, मुलांचे आजार, पालकांची शिक्षणाबद्दलची अनास्था हेही घटक फार महत्त्वाचे आहेत. म्हणून 2018 मध्ये मुलांसाठी वसतिगृह सुरू केले.
आर्थिक मदत कोणाची मिळते?
ओळखीच्या, परिवारातल्या अनेक लोकांनी वैयक्तिक मदत दिली आहे, देत आहेत, पण मुलांची आवक जास्त असल्यामुळे खर्च भागविण्याकरिता अधिक मदतीची गरज आहे.
सध्या किती मुलं शिकतात?
एकूण 460 मुलांसाठी काम करतो. त्यापैकी 120 वसतीगृहात राहतात. आजूबाजूच्या गावातून येणारी मिळून एकूण 260 मुलं शाळेत शिकतात आणि गावांमध्ये जाऊन 200 मुलांना आम्ही खेळाचं प्रशिक्षण त्यांच्या शाळेव्यतिरिक्तच्या सकाळ आणि संध्याकाळच्या मोकळ्या वेळात देतो. खेळामुळे शिक्षणाची गोडी वाढते.
शाळा, वसतिगृह कोणत्या जागेत आहे?
सध्या गाडय़ांची जागा आहे तीन इमारतींमध्ये जिथे मुलं राहतात तिथेच त्यांचे वर्ग भरतात. चार एकर जागा घेतली आहे निधी उभारून. तिथे शाळेची इमारत बांधायची आहे. प्रियाच्या उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधता येईल.
तुम्ही वर्गात काय शिकवता यापेक्षा मुलं आजूबाजूच्या परिस्थितीतून मोठय़ांच्या वागण्या-बोलण्यातून जास्त शिकत असतात. त्यामुळे मुलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पूरक असा दिनक्रम असतो. सकाळी साडेचारला उठून सूर्यनमस्कार, त्यांच्या वयोगटाप्रमाणे व कौशल्याप्रमाणे उपलब्ध साहित्यामध्ये प्राथमिक शाळेतल्या मुलांना फुटबॉल, संगणक, भाषा यांचं प्रशिक्षण सकाळच्या वेळात पाचवीपर्यंतच्या मुलांना दिलं जातं. आंघोळ -नाश्ता वगैरे झाल्यानंतर 10 ते 4.30 पर्यंत शाळा असते. शाळेला अनिवासी मुलेही येतात. शाळेमध्ये पाचवीपर्यंत लिहिणे, वाचणे, एका भाषेवर प्रभुत्व, गणित हे मुलांना येईल अशी शिक्षणपद्धती असते. मुलांना फुटबॉल, कोडिंग, संगणक या विषयांचं प्रशिक्षण देतो.


























































